कळंब : शेतपंपाची वीज चालू करण्याच्या कारणावरून भोगजी येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात घुसून, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर, आरोपींनी उपकेंद्रातील यंत्रणेशी छेडछाड करून दोन तास वीजपुरवठा खंडित केला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून तीन जणांवर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मन्मथ जटाळ, गणेश जटाळ आणि अंकुश धुमाळ (सर्व रा. आथर्डी, ता. कळंब) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महावितरणचे कर्मचारी औदुंबर शिवाजी गोडगे (वय ४१, रा. गंभीरवाडी, ता. कळंब) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २२ मार्च) दुपारी ३:२० वाजेच्या सुमारास औदुंबर गोडगे हे भोगजी येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात आपले शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी आरोपींनी तिथे येऊन ‘आथर्डी शेतशिवारातील शेतपंपाची लाईट चालू करा, अन्यथा पूर्ण उपकेंद्र बंद करू’ अशी भूमिका घेतली. गोडगे यांनी त्यांना ‘सध्या आथर्डी शेतशिवारातील शेतपंपाच्या लाईटची वेळ नसल्याने वीजपुरवठा चालू करता येत नाही’ असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपींनी सेलु फिडर आणि कॅपॅसिटर बँक बंद करून ३३ केव्ही इनकमरसोबत छेडछाड केली. तसेच, फिर्यादी गोडगे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि मारहाण करण्याची धमकी दिली. आरोपींच्या या कृत्यामुळे तब्बल दोन तास वीजपुरवठा बंद राहिला.
या घटनेनंतर औदुंबर गोडगे यांनी सोमवारी (दि. २३ मार्च) कळंब पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. या प्रथम खबरेवरून पोलिसांनी मन्मथ जटाळ, गणेश जटाळ आणि अंकुश धुमाळ या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा व अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






