कळंब : चारा-पाण्याची सोय न करता ११ गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी पिंपळगाव पाटीजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख मतीन शेख सिकंदर (वय ४६, रा. बागा वस्ती, रत्नागिरी फाटा, नेकनूर, जि. बीड) हा आयशर टेम्पो (क्र. एमएच २५ यु ०६६९) मधून जनावरे घेऊन जात होता. १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कळंब-धाराशिव रस्त्यावरील पिंपळगाव पाटीजवळ पोलिसांनी या टेम्पोला अडवले.
तपासणी केली असता, टेम्पोमध्ये ९ जर्सी गायी आणि २ बैल अशी एकूण ११ गोवंशीय जनावरे दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळले. त्यांची किंमत अंदाजे १,५०,००० रुपये आहे. या जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती आणि त्यांची निर्दयपणे वाहतूक केली जात होती.
याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देत आरोपी शेख मतीन विरोधात गुन्हा नोंदवला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमांनुसार (कलम ५(अ), ५(बी), ९(ब), ११ आणि कलम ११(१), ११(१)(ए), ११(१)(एफ), ११(१)(एच), ११(१)(आय)) ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.




