कळंब – उसतोडणीच्या ट्रॅक्टर मालकाकडून होत असलेल्या सततच्या पैशाच्या मागणी आणि धमकीच्या त्रासाला कंटाळून खामसवाडी (ता. कळंब) येथील एका २५ वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष दिगंबर सौदागर असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३ जुलै रोजी घडली असली तरी, तब्बल १६ दिवसांनंतर मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एका व्यक्तीविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत संतोष सौदागर हा खामसवाडी येथील ज्ञानेश्वर तुकाराम बंडगर याच्या उसाच्या ट्रॅक्टरवर कामाला होता. आरोपी बंडगर याला संतोषच्या वडिलांकडून ४०,००० रुपये येणे होते. या पैशांसाठी बंडगर हा संतोषकडे वारंवार तगादा लावून त्याला धमकावत होता.
या सततच्या त्रासाला कंटाळून संतोषने दि. ३ जुलै २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खामसवाडी शिवारातील एका शेतात विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.
याप्रकरणी मयताची आई, वंदना दिगंबर सौदागर (वय ३५), यांनी दि. १९ जुलै २०२५ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम बंडगर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.