नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर (नळदुर्ग) येथे प्रसिद्ध श्री खंडोबा आणि बाणाई यांचे विवाहस्थळ आहे. सध्या सुरू असलेल्या यात्रोत्सवा दरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दर रविवारी भरणारी यात्राही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मात्र या उत्साहावर विरजण टाकणारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानांमध्ये बनावट हळद आणि निकृष्ट दर्जाचे खोबरे सर्रास विकले जात आहे. श्री खंडोबाच्या मंदिरात भंडारा (हळद) आणि खोबरे उधळण्याची प्रथा आहे. याचा गैरफायदा घेत काही दुकानदार हळदी ऐवजी पिवळा रंग विकत आहेत. हा रंग त्वचेसाठी घातक असून यामुळे भाविकांना त्वचेचे आजार होत आहेत. डोळ्यात गेल्यास डोळे चरचरणे, जळजळ होणे असे त्रास होत आहेत. तसेच निकृष्ट दर्जाचे खोबरेही भाविकांच्या माथी मारले जात आहे.
या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली असता, त्यांनी हे अन्न व भेसळ प्रशासन विभागाचे काम असल्याचे सांगून हात झटकले. तर अन्न व भेसळ प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणाऱ्या या यंत्रणांमुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
या यात्रोत्सवात बनावट हळद आणि खोबऱ्याच्या विक्रीला आवर घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या या दुकानदारांवर आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तात्काळ या गंभीर प्रकाराची दखल घेऊन भाविकांच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.