धाराशिव – खरीप हंगाम २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल २५० कोटी रुपयांची विमा भरपाई पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे सुमारे ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे.
राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीकडे देण्याचा शासन निर्णय २७ मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही रक्कम लवकरच विमा कंपनीकडे पोहोचणार असून कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा केली जाणार आहे.
या हंगामात जिल्ह्यातील ७,१९,१६७ शेतकऱ्यांनी ५,७९,८१६.२१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आणले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याची ५,४९,७९१ पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून त्यातील ५,३२,८२६ शेतकरी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ४,७०,०७२ शेतकरी फक्त सोयाबीन पिकासाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रु. ६००० ते रु. ६५०० भरपाई मिळण्याची शक्यता आहे. तसेच काढणीनंतर झालेल्या नुकसानीसाठी ६०,७८२ तक्रारींनुसार शेतकऱ्यांना रु. ७००० ते ११,००० पर्यंत नुकसानभरपाई मिळणार आहे.
दरम्यान, काही विरोधकांकडून विमा कंपनीने २५० कोटींचीच भरपाई देऊन उर्वरित ३४६ कोटींचा फायदा उचलल्याचा आरोप केला जात आहे. यावर आमदार पाटील यांनी खुलासा करत सांगितले की, हे विधान अज्ञानातून केले गेले आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यात १००:८०:११० हे सूत्र लागू असून कोणत्याही विमा कंपनीला २० टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू दिला जात नाही. विरोधकांनी याऐवजी ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही याचा शोध घ्यावा, अशी टीका त्यांनी केली.