धाराशिव – पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी डिसेंबर २०२४ अखेरीस तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा प्रकल्पात दाखल होणार आहे. यामुळे तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण ७०७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी महायुती सरकारने ११ हजार ७२६ कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. सिंदफळ येथील पंपगृहातून डिसेंबर २०२४ अखेरीस २.२४ टीएमसी पाणी रामदरा तलावात दाखल होईल.
रामदरा येथून हे पाणी बोरी-एकुरगा आणि तेथून बंद पाईपलाईनद्वारे तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात जाणार आहे. पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात नव्याने बांधकाम केलेले आणि यापूर्वी अस्तित्वात असलेल्या एकूण १० साठवण तलाव आणि बॅरेजेसमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे.
सिंदफळ येथील पंपगृहातून रामदरा तलावापर्यंतचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यानंतर पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तीन तालुक्यांतील साधारणतः ७५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी ८५ किलोमीटर लांबीची पाईपलाईन अंथरण्यात येणार आहे. रामदरा येथील पंपगृहातून उपसा सिंचन पद्धतीने पाणी उचलून बोरी-एकुरगा गावापर्यंत नेले जाणार आहे. तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यात पाईपलाईनद्वारे हे पाणी वाटेत येणाऱ्या आठ तलाव आणि दोन बॅरेजेसमध्ये भरून घेतले जाणार आहे. यामुळे सिंचन क्षमतेत ४०% वाढ होऊन सिंचन क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत वाढणार आहे.