लोहारा- लोहारा तालुक्यातील माकणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. संस्थेच्या मॅनेजरने आपल्या पत्नीशी संगनमत करून बनावट पावत्यांद्वारे आणि खात्यातील रक्कम परस्पर वळती करून संस्थेची आणि ठेवीदारांची तब्बल १ कोटी ७९ लाख ६७ हजार १७० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात मॅनेजर पती आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपहार १ फेब्रुवारी २०२० ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला. आरोपी महादेव मुर्गे हा माकणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने या कालावधीत ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या, मात्र मुदत संपल्यानंतर त्या रकमा परत केल्या नाहीत. त्याऐवजी शाखेच्या बनावट मुदत ठेव पावत्या छापून त्या ठेवीदारांना दिल्या.
तसेच, ठेवीदारांच्या व बँकेच्या खातेदारांच्या बचत खात्यावरील एकूण १ कोटी ७९ लाख ६७ हजार १७० रुपये परस्पर उचलले. ही रक्कम त्याने स्वतःच्या आणि पत्नी ज्योती मुर्गे हिच्या नावावर असलेल्या ‘महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा माकणी’ येथील खात्यावर वर्ग करून हडप केली.
आरोपींची नावे:
१. महादेव हावगिरप्पा मुर्गे (रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव) २. ज्योती महादेव मुर्गे (रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव)
याप्रकरणी ज्योतेश रामराज कावळे (वय ३५, व्यवसाय: खाजगी नोकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., आनंदनगर, धाराशिव. रा. कावळेवाडी) यांनी २० जानेवारी २०२६ रोजी फिर्याद दिली.
त्यानुसार, लोहारा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक), ३१६(५) (विश्वासघात), ३३८, ३३६(३), ३४०(२) आणि ३(५) (संगनमत) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.







