लोहारा – धानुरी येथील ८१ वर्षीय वृद्ध शेतकरी जीवन तुळशीराम साळुंके यांनी आपल्या मालकीच्या जमिनीवरील चंदनाचे झाड बेकायदेशीर तोडल्याच्या निषेधार्थ २६ जानेवारी २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
साळुंके यांच्या मते, त्यांच्या गट क्रमांक ५८ मधील उत्तर दिशेला असलेल्या चंदनाच्या झाडाची महात्माजी निवृत्ती साळुंके आणि मनोज महात्मा साळुंके यांनी शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर कत्तल केली. यावेळी त्यांनी या कृत्याला विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
घटनेनंतर साळुंके यांनी लोहारा पोलीस आणि पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, परंतु पोलीस आणि वनविभागाकडून योग्य ती कारवाई झाली नाही. तसेच संबंधित व्यक्ती राजकीय दडपशाही आणि दहशत निर्माण करत असल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे.
साळुंके यांनी १७ डिसेंबर २०२४ रोजीही यासंदर्भात अर्ज केला होता, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
त्यांनी महसूल आणि वनविभागाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.