लोहारा : गाडी खरेदी करण्याचा बहाणा करून विश्वास संपादन करायचा आणि नंतर गाडीसह पसार होऊन मालकाला लाखोंचा चुना लावायचा, असा फसवणुकीचा प्रकार लोहाऱ्यात उघडकीस आला आहे. इरफान इमाम सय्यद (वय ४०, रा. लोहारा खुर्द) यांच्या मालकीची हुंडाई क्रेटा (Hyundai Creta) कार खरेदी करण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन, तिचा परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी लातूर येथील एका व्यक्तीविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इरफान सय्यद आणि आरोपी इरफान मन्सुर लोहारे (रा. औसा, ह.मु. लातूर) यांच्यात सय्यद यांच्या मालकीची क्रेटा कार (क्र. एमएच ०९ डीएक्स ०७०७) विकण्याबाबत व्यवहार ठरला होता. ठरल्याप्रमाणे, आरोपी लोहारे याने दि. १० मे २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सय्यद यांच्याकडून गाडी ताब्यात घेतली.
मात्र, गाडी घेऊन गेल्यानंतर आरोपीने खरेदी-विक्रीबाबत कोणताही लेखी करार किंवा वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. फिर्यादी सय्यद यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो टाळाटाळ करू लागला. अखेर, आरोपीने गाडीची परस्पर विल्हेवाट लावून आपला विश्वासघात केल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले.
जवळपास तीन महिने वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर इरफान सय्यद यांनी दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी लोहारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी इरफान मन्सुर लोहारे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) (विश्वासघाताने मालमत्तेचा अपहार) आणि ३१८(४) (फसवणूक) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू केला आहे.