धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघाची निवडणूक ७ मे रोजी पार पाडली. मतदान होऊन आजमितीस १७ दिवस झाले असून निकालाला अजून १० दिवस बाकी आहेत, या मतदारसंघातून विजयी कोण होणार ? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.
धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
४ जून रोजी मतदमोजणी
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. धाराशिव मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. एकूण २९ ते ३० फेऱ्या होणार असून, प्रत्येक फेरीसाठी किमान १५ मिनिटे लागणार आहेत. निकालाचा कल येण्यास किमान सात तास लागणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १४ टेबल असणार आहेत. त्यासाठी ११०० कर्मचारी राबणार असून, जवळपास १०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
कोण बाजी मारणार ?
धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. उस्मानाबाद – कळंब वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघाचे आमदार महायुतीचे आहेत. तसेच विक्रम काळे आणि सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार देखील महायुतीचे आहेत. त्यात काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकाकी लढत दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरुवातीला खा. ओमराजे निंबाळकर पुन्हा निवडून येतील असा अंदाज सर्वच वृत्तवाहिनीनीने व्यक्त केला होता. परंतु भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच, निवडणूक एकतर्फी न होता, अटीतटीची झाली. शेवटच्या सात दिवसात महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील आघाडी घेतल्याने काट्याची टक्कर झाली आहे. त्यामुळे कोण विजयी होणार ? हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.
धाराशिव लाइव्हने सहाही विधानसभा मतदारसंघाचा कानोसा घेतला आहे. धाराशिव शहर आणि कळंब तालुक्यात ओमराजे निंबाळकर यांना आघाडी मिळाली आहे. ( ओमराजे ६० टक्के , अर्चना ताई ४० टक्के ) , औसा , उमरगा – लोहारामध्ये अर्चनाताई पाटील यांनी आघाडी घेतली आहे. ( ओमराजे ४० टक्के , अर्चना ताई ६० टक्के ) , तुळजापूर ( ( ओमराजे ४८ टक्के , अर्चना ताई ५२ टक्के ) , बार्शी – ( ओमराजे ४९ टक्के , अर्चना ताई ५१ टक्के ) , भूम , परंडा , वाशी ( ओमराजे – ५२ टक्के , अर्चनाताई – ४८ टक्के ) दोन्ही उमेदवारात मताचा फरक जास्त नाही.
ओमराजे यांचे प्लस पाईंट
– मोठा- जनसंपर्क , सोशल मीडियावर आघाडी
– मुस्लिम मतदार १०० पैकी ७० टक्के बाजूला
– मराठा मतदार १०० पैकी ७० टक्के बाजूला
ओमराजे यांचे मायनस पाईंट
– एकाकी लढत, मित्रपक्ष कुमकुवत
– मुस्लिम मतदार गृहीत धरून यंत्रणा पुरवली नाही.
– तेरणा पट्ट्यात नाराजी
– सरकारी कर्मचारी वर्ग नाराज
अर्चना ताई पाटील यांचे प्लस पाईंट
– महायुतीचे ७ आमदार सोबत
– काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण सोबत
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान
– ओबीसी मतदार बाजूला – महिला वर्गात लोकप्रियता
– सत्ताधारी पक्ष असल्यामुळे मतदारावर प्रभाव
– मोठे नेटवर्क , प्रचार यंत्रणा हायजॅक
अर्चना ताई पाटील यांचे मायनस पाईंट
– आमदार पती राणा जगजितसिंह पाटील भाजप आणि स्वतः राष्ट्रवादी यामुळे महायुतीला मानणारा १० टक्के वर्ग नाराज
– घराणेशाहीचा आरोप
– मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी वादग्रस्त विधान केल्याने मराठा मतदारांचा फटका
धाराशिव लाइव्हचा अंदाज …
ओमराजे आणि अर्चनाताई यापैकी कुणीही निवडून आला तरी २५ ते ३० हजार मताच्या फरकाने निवडून येईल, असा अंदाज आहे.