धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार रिंगणात उतरले होते. अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना पाटील यांच्यात सरळ लढत झाली. ओमराजे निंबाळकर हे ३ लाख २९ हजार ८४६ मताधिक्याने विजयी झाले. पण या मतदारसंघात आणखी एका निंबाळकरची चर्चा होत असून, हे निंबाळकर अपक्ष उभा राहूनही १९ हजार मते घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना ( उबाठा ) उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना एकूण ७ लाख ४८ हजार ७५२ मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सौ. अर्चना पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार गट ) यांना ४ लाख १८ हजार ९०६ मते पडली. वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांना फक्त ३३ हजार ४०२ मतावर समाधान मानावे लागले. त्या खालोखाल अपक्ष गोवर्धन निंबाळकर यांना १८ हजार ९६६ मते पडली.
राज्यात ४८ पैकी अनेक उमेदवार पाच हजार मताच्या आत पराभूत झाले आहेत. शेजारच्या बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे या ६ हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. अश्या परिस्थितीत धाराशिव मतदारसंघात अपक्ष गोवर्धन निंबाळकर यांना १८ हजार ९६६ मते पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
२९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे ३ लाख २९ हजार ८४६ मताधिक्याने विजयी झाल्यामुळे महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना पाटील वगळता अन्य २९ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ( सन २०१९ ) ओमराजे निंबाळकर १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांना धूळ चारली होती. यंदा तिप्पट मताधिक्य घेऊन राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पराभूत केले.
पाच आमदार डेंजर झोनमध्ये
महायुतीकडे विधानसभेचे पाच आणि विधान परिषदेचे दोन असे सात आमदार, त्यात काँग्रेसमधून आयात केलेले बसवराज पाटील आणि सुनील चव्हाण यांची फळी असताना, महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांची ‘वन मॅन आर्मी’ मोदीच्या त्सुनामी लाटेवर भारी पडली.
लोकसभेची निवडणूक ही आमदारांसाठी ‘लिटमस टेस्ट ‘ होती. त्यात फक्त शिवसेना ( उबाठा ) आमदार कैलास पाटील पास झाले तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील ( तुळजापूर ) अभिमन्यू पवार ( औसा ) , राजेंद्र राऊत ( बार्शी ) तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले नापास झाले. आ. कैलास पाटील वगळता अन्य पाच आमदार डेंजर झोनमध्ये आले आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघे चार – पाच महिने उरले आहेत. लोकसभेत झालेली चूक विधानसभा निवडणुकीच्या वेळी नाही सुधारल्यास महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ३ लाख २९ हजार मतांनी पराभव झाला. या पराभवामुळे आता महायुतीलाच जिल्ह्यात सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे सेनेचे कैलास पाटलांच्या धाराशिव मतदार संघात ओमराजेंनी १ लाख ३७ हजार १५८ तर अर्चना पाटलांनी ७६ हजार ७३५ मते घेतली. ओमराजेंना ६० हजार ४२३ ची आघाडी मिळाली. हीच आघाडी पाटील यांना सेफ झोनमध्ये घेऊन जाणारी आहे. तेथे आता महायुतीला प्रबळ व तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे.
पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या परंडा मतदार संघात ओमराजेंनी तब्बल १ लाख ३३ हजार ८४८ मते घेऊन ८१ हजार १७७ मतांची आघाडी मिळवली. महायुतीला ५२ हजार ६७१ मते मिळाली. याचे श्रेय राहुल मोटे यांनाही दिले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मोटे यांची लिटमस टेस्ट ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत इतकी मते खेचली तर आगामी निवडणुकीत किती मिळणार ? याची चर्चा आहे. यामुळे सावंत यांना आतापासून तळ ठोकावा लागणार आहे.आमदार राणा पाटील यांचा मतदार संघ असलेल्या तुळजापूरात ओमराजेंना ५२ हजार १७६ मतांची आघाडी मिळाली. ओमराजेंना १ लाख ३८ हजार ७९१ मते मिळाली तर अर्चना पाटलांना ८६ हजार ६१५ मते मिळाली. यामुळे आमदार पाटील यांना विधानसभेची निवडणूक जड जाणार आहे.