तुळजापूर – तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पाच वेळा आमदार राहिलेले, तसेच माजी मंत्री आणि अनुभवी राजकारणी मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीत तिकीट नाकारले आहे. काँग्रेसने त्यांच्या जागी ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हा निर्णय अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अनपेक्षित ठरला असून त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत वातावरणात संतापाचे सूर उमटले आहेत.
मधुकरराव चव्हाण यांची तुळजापूर मतदारसंघात खास ओळख आहे. त्यांनी पाच वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासकामे, आणि स्थानिक पातळीवर केलेल्या कामामुळे त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे. त्यामुळे त्यांना तिकीट न दिल्याने अनेक कार्यकर्ते आणि समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची मागणी केली, आणि चव्हाण यांनी लोकांच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेस पक्षाने चव्हाण यांच्यावर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या आदेशाला मान देऊन निवडणूक न लढवण्यास सांगण्यात आले. मात्र चव्हाण यांनी हा दबाव धुडकावून लावत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तुळजापूर मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे.
चव्हाण यांच्याकडे स्थानिक पातळीवर मोठा जनाधार आहे. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या अनेक विकासकामांनी तुळजापूर मतदारसंघातील जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या अपक्ष उमेदवारीने या निवडणुकीत काँग्रेसला मोठे आव्हान निर्माण होणार आहे. तसेच इतर पक्षांनाही त्यांचा हा निर्णय धक्का देणारा ठरला आहे. चव्हाण यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली सहानुभूती व वाढता पाठींबा पाहता त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राणाजगजितसिंह पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत.
तुळजापूर मतदारसंघातील ही निवडणूक चव्हाण यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे अधिक चुरशीची होणार आहे. त्यांच्या स्थानिक लोकप्रियतेमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चव्हाण यांच्या निवडणुकीतील सहभागामुळे धीरज पाटील यांची मात्र मोठी कोंडी झाली असल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे.
काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या परिस्थितीचा अभ्यास करून चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली असली, तरी त्यांनी लढणारही व जिंकणार ही ठाम भूमिका घेतल्यामुळे पक्षाला आता नव्या रणनीतीची आखणी करावी लागणार आहे.