महाराष्ट्रात राजकारणाचा कुस्तीमैदान पुन्हा भरलाय… पण यावेळी रंगात आलेली कुस्ती WWEपेक्षा कमी नाही!
एकीकडे शिवसेनेचा वाघ उद्धव आणि मनसेचा बिबट्या राज पुन्हा एकाच रिंगमध्ये येणार, अशी कुजबुज आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ‘काका’ शरद आणि ‘पुतण्या’ अजित हे एकाच शेकड्याचं गणपती मंडळ पुन्हा एकत्र बसवणार, अशी चर्चा आहे. म्हणजे राजकारणात ‘सांभाळून घ्या भावांनो, वळणं धोक्याची आहेत’ अशा पाट्या लावण्याची वेळ आलीये.
उद्धव-राज या दोघांमध्ये पूर्वी “माझ्या गल्लीत तुझं पोस्टर नको” टाईप स्पर्धा होती, आता ती “आपल्या गल्लीत भाजपचं पोस्टर कसं फाडायचं?” या अजेंड्यावर आलीये. त्यात राज ठाकरे अचानक महेश मांजरेकरच्या यूट्यूब वर भावुक होऊन म्हणतात, “वाद आहेत, पण महाराष्ट्र त्याहून मोठा आहे…” तेव्हा वाटतं, हा YouTube इंटरव्ह्यू नाही, हा ‘राज-उद्धव पुनर्मिलनाचा’ प्री-टीजर आहे!
आता दुसरी कथा – पवार वंशाचा टीव्ही सिरीयल लेव्हल प्लॉट!
काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार – एकमेकांवर आरोप करत करत जे जरा लांब गेले होते, ते आता “आपल्यात फार भांडण झालं… चला पुन्हा एकत्र येऊ” मोडमध्ये. म्हणजे ‘घरचा पवार बाहेरचा पाडळकर नको’ अशी घराणेशाहीतली घोषणा होऊ लागलीय.
या सगळ्यावर सोशल मीडियावर जबरदस्त फटकेबाजी सुरु आहे –
- “एकत्र येण्याआधी नातेवाईकांचे आधारकार्ड तपासा.”
- “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कौटुंबिक समारंभ मोफत!”
- “काका-पुतणं एकत्र आले, आता फडणवीसकाका कुणाला भेटणार?”
एकंदरीत, सध्या राजकारण हे कुटुंबप्रेम VS कुंडलीप्रेम
यांच्यात अडलंय. कोण कधी एकत्र येईल, कोण कधी वेगळं जाईल, हे इतकं अनिश्चित आहे की सास-बहू मालिकांनाही हे स्क्रिप्ट फॉलो करता येणार नाही.
राजकारण जरी चक्रीवादळात असलं, तरी प्रेक्षक मात्र मजा घेतायत – ‘नात्यांमध्ये गोंधळ, पवारांमध्ये झोंबळ आणि ठाकरे बंधूंमध्ये गोंधळ गोंधळ!’
कथानक पुढील आठवड्यात वळणार कुठे – ते पहा, ‘सत्ता संसार’ या मालिकेत!
- बोरूबहाद्दर