भूम : कत्तलीच्या उद्देशाने एका पिकअपमधून गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला भूम पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ जिवंत वासरांसह एक गाय, एक रेडकू, एक कालवड आणि चार मृत वासरे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. १७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भूम शहरातील फ्लोरा चौकात करण्यात आली.
भूम पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फ्लोरा चौकात सापळा रचण्यात आला. यावेळी एमएच १८ बी.एल. १४५४ या क्रमांकाचा पिकअप अडवून तपासणी केली असता, त्यात जनावरे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली. आरोपीने जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना अत्यंत निर्दयतेने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे उघड झाले. वाहनात ११ जिवंत वासरे, १ जर्सी गाय, १ रेडकू, १ कालवड आणि गुदमरल्याने मरण पावलेली ४ वासरे सापडली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रमजान फरीद शेख (वय २१, रा. बावची, ता. परंडा) याला अटक केली आहे. जप्त केलेल्या जनावरांची किंमत ६१,००० रुपये असून, वाहनासह एकूण ४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस तक्रारीवरून आरोपी रमजान शेख याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.