कळंब – कळंब तालुक्यातील खामसवाडी शिवारात शेतातील उभ्या उसाच्या पिकाला आग लावून मोठे नुकसान केल्याप्रकरणी एका ६९ वर्षीय व्यक्तीविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आगीत ऊस, ठिबक सिंचन संच, केबल व पाईपलाईन जळून अंदाजे ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
याबाबत शिराढोण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंब शहरातील शास्त्रीनगर येथे राहणारे सारंग प्रकाशराव जोशी (वय ४२ वर्षे) यांची खामसवाडी शिवारात गट क्रमांक २६९ मध्ये ९९ आर शेती आहे. या शेतात त्यांनी उसाचे पीक घेतले होते. २५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अंदाजे १ वाजण्याच्या सुमारास खामसवाडी येथील रहिवासी जनक वैजीनाथ कुंभार (वय ६९) यांनी जोशी यांच्या गट नं. २६९ मधील उसाच्या पिकाला आग लावली.
या आगीमध्ये उसाचे पीक जळून खाक झाले, तसेच शेतातील ठिबक सिंचन संचाची लाईन, केबल आणि पाईपलाईन जळून फिर्यादीचे अंदाजे ३,५०,००० रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेप्रकरणी शेतमालक सारंग जोशी यांनी ३ मे २०२५ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी जनक कुंभार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२६(एफ) नुसार गुन्हा नोंदवला आहे. आग लावण्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.