निवडणुकीचं वारं सुटलं की राजकारण्यांना अचानक जनता आठवायला लागते. कर्ज, नोकऱ्या, मदतीचे वायदे, महिलांसाठी योजना – सगळं काही आश्वासनांच्या ढिगाऱ्यात पेरलं जातं. हा सगळा जाहीरनामा म्हणजे ‘कसं आकर्षित करायचं’ याचं जणू उदाहरण असतं!
आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला केवळ काहीच दिवस उरले आहेत. सत्तेत महायुति (भाजप, शिवसेना – शिंदे गट, राष्ट्रवादी – अजित पवार गट) आणि विरोधात महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना – उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी – शरद पवार गट). दोघांनीही आपले चकचकीत जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत, जणू जनतेच्या संसारातल्या सगळ्या समस्या याच निवडणुकीच्या घोषणांनी निघणार आहेत!
महायुती म्हणते, “लाडकी बहिण योजना रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करतोय,” तर महाविकास आघाडी थेट ३००० रुपये देणार म्हणतेय. असं बघितलं तर महाराष्ट्रात बहिणींचा मोठा मान होणारच दिसतोय! महायुतीला सगळी अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५,००० रुपयांचं मानधन देणारचं जाहीर केलंय, जणू यांना असे वाटतं की हे पैसे मिळाले की ह्या सेविका काय मागेच चिरंजीव राहणार!
महायुतीकडून अजून एक चककणारा मुद्दा – “२५ लाख नोकऱ्या” हा वायदा. आत्ता तरुण वर्ग हसत-हसत पोट धरून हसतोय. कारण गेल्या काही वर्षांतल्या वायद्यांचं काय झालं हे त्यांना चांगलं माहीत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने बेरोजगारांना ४००० रुपये देण्याची स्कीम आणलीये, म्हणजे हे पक्ष मतदानानंतरही ‘बेरोजगारां’ची काळजी घेताय का बघूया!
शेतकऱ्यांना तर यावेळी सगळ्यात भारी वायदे मिळालेत. महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि किमान समर्थन मूल्यात २०% वाढ आहे, तर महाविकास आघाडी म्हणतेय की तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५०,००० रुपयांचं प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे सगळा गेमच मुळात सत्तेचा आहे – शेवटी कोणाचा जाहीरनामा सत्यात उतरणार?
यावरून गावखेड्यात गप्पांचा फड रंगतोय. पारावर पक्या आणि भावड्या यांच्यात गप्पा सुरु होत्या.
पक्या: काय रे भावड्या, निवडणुकीच्या वेळी ह्या पक्षांना अचानक इतकं प्रेम कुठून सुटलंय जनतेवर?
भावड्या: हो ना पक्या! ह्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात सगळेच वायदे ऐकून लोकांना वाटायला लागलंय, “आपल्याकडे परत पैसा, मोफत सेवा आणि कर्जमाफीचा जणू पाऊसच पडणार!”
पक्या: सगळं काही हवं त्या बहिणींना मिळणार म्हणे! महायुती म्हणतेय की, “लाडकी बहिण योजनेत २१०० रुपये देऊ,” तर महाविकास आघाडी थेट ३,००० रुपये देणार म्हणतेय! बहिणींच्या नावावर निवडणूक जिंकण्याचाच प्रयत्न दिसतोय.
भावड्या: (हसत) हो, हो, लाडक्या बहिणींना तर नक्कीच भारी ‘भाऊ’ मिळालेत ह्या निवडणुकीत! पण पक्या, शेतकऱ्यांची गोष्ट काय करायची? महायुती म्हणतेय की कर्जमाफी करणार, आणि महाविकास आघाडी म्हणते की थेट तीन लाखांपर्यंत कर्ज माफ!
पक्या: अरे, म्हणजे आता शेतकरी शेवटी कर्ज घेतील का पैसे मिळवतील हेच कळेनासं झालंय! हे ऐकून शेतकऱ्यांनी थेट बैलाच्या शिंगावर जाहीरनामा अडकवला, “हे सगळं खरं झालं तर बैलाला मी आराम देईन!”
भावड्या: आणि बेरोजगारांचं काय? महायुती म्हणते २५ लाख नोकऱ्या देणार, आणि महाविकास आघाडी बेरोजगार तरुणांना ४,००० रुपये मासिक मदत देणार म्हणतेय! म्हणजे आता तरुणांचे बेरोजगारीचे दिवस गोड होणार?
पक्या : (हसत) अहो, बेरोजगारांना २५ लाख नोकऱ्या मिळायच्या वाटच पहातायत, पण त्याआधी ४००० रुपये घ्यायला लागले की बहुतेक त्यांची नोकरी कधी मिळाली तेच त्यांना समजणार नाही!
भावड्या: (हसून हसून पोट धरत) आणि पक्या, सरकारी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास? म्हटलं आता बसमध्ये गर्दी वाढणार, पण महाविकास आघाडीचे म्हणणं आहे की महिला नक्कीच सरकारला प्रेमानं गाडीतून हात हलवणार!
पक्या: ते काही नाही, आता मतदानाच्या दिवशी जनता मात्र त्यांचा भरपूर ‘हात’ दाखवणार आहे!
निवडणुकीच्या ह्या धुमाकुळात कोणता पक्ष जाहीरनाम्याचा फटाका फोडणार आणि कोणता फुसका बाण ठरणार, हे मात्र २३ तारखेलाच कळेल!
– बोरूबहाद्दर