धाराशिव – मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी धाराशिव आणि परंडा या दोन मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच तुळजापूर आणि उमरगा मतदारसंघात कोणाला पराभूत करायचे, याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धाराशिव आणि परंडा मतदारसंघात मनोज जरांगे यांचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघांमध्ये उमेदवारी कोणाला मिळते, याची उत्सुकता वाढली आहे.
धाराशिवमध्ये उमेदवार उभा करण्यामागचे कारण स्पष्ट झाले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीन लाख मतांनी विजय मिळवला होता. विजयानंतर पत्रकारांनी त्यांना मराठा फॅक्टरमुळे विजय झाला का असे विचारले असता, निंबाळकर यांनी विविध फॅक्टरमुळे विजय झाल्याचे सांगितले होते. तसेच केंद्र सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा वाढवली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी धाराशिवमध्ये उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.