मुंबई: मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे ९ दिवस उपोषण केले. त्यांनी उपोषण स्वतःहून मागे घेतले असले तरी, या दरम्यान त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते.
यावर फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, राज्याचे निर्णय एकट्या त्यांच्याकडून घेतले जात नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ते स्वतः असे तिघेजण मिळून निर्णय घेतात. ते पुढे म्हणाले की, “ज्यादिवशी मुख्यमंत्री शिंदे म्हणतील की देवेंद्र फडणवीस आडकाठी आणत आहेत, त्यादिवशी मी स्वतः राजीनामा देईन आणि राजकीय संन्यास घेईन.”
फडणवीस यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीची माहिती दिली. त्या बैठकीत शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे आमदार उपस्थित होते. बैठकीत निर्णय झाला की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे. फडणवीस म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पहिला निर्णय घेतला होता, तरीही जरांगे पाटील यांनी उपोषणात मला लक्ष्य केले.”
लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना मदत केली होती. “जर त्यांची सत्ता आली, तर ते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देतील का, हे त्यांच्याकडून लिहून घ्यावे. तसे झाल्यास विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी त्यांना मदत करावी,” असे फडणवीस यांनी सुचवले.मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण राजकारण करत आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, असेही फडणवीस म्हणाले.