जालना – मराठा समाजाला जाणून बुजून तापवलं जातंय. तुम्हाला माझ्याशी जे बोलायचं आहे ते इथे येऊन बोला आणि नसाल येणार तर नका येऊ. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या; अशी स्पष्टोक्ती मनोज जरांगे पाटील यांनी आज (ता. १ नोव्हेंबर) उपोषणस्थळी दिली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन सुरू आहे. सध्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून राज्यात ओबीसी समाजाच्या नेत्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीतून हिंसक आंदोलनामुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचा सूर निघाला. तसंच, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काहीसा वेळ लागणार असल्याने मनोज जरांगे – पाटील यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा या बैठकीत व्यक्त झाली.
या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावावर बोलण्यासाठी उपोषणस्थळी जरांगे – पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारचा समाचार घेत त्यांना थेट इशाराच दिला आहे.
जरांगे – पाटील म्हणतात, “सरकारला वेळ द्यायचा की नाही हे समाजासोबतच्या चर्चेनंतर ठरवू. गोर-गरीब मराठ्यांच्या लेकरांकडे लक्ष द्यायचं सोडून सरकार बैठका घेतंय. मराठ्यांना हसण्यावारी नेतंय. याला काय सरकार म्हणायचं का? आम्ही ऐकतो म्हणून आमच्याशी कसंही वागणार का? गोर-गरीबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करायचं काम सरकार करतंय.”
ते पुढे सरकारला इशारा देताना म्हणाले की, “आता वेळ मागतायत तर इतके दिवस काय करत होते? मराठा समाजाला जाणून बुजून तापवलं जातंय. जे काही बोलायचं इथे येऊन बोला. तिकडून गप्पा मारू नका. आज संध्याकाळपासून मी पाणीच सोडणार आहे. मी उपोषण सोडणारच नाही. इथे येऊन बोला, इथे येताना तुमचं आमचे मराठे रक्षण करतील आणि नसाल येणार तर नका येऊ. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या.”
जरांगे पाटील असंही म्हणाले की, “मला म्हणतात मंत्र्यांना अरे – तुरे बोलू नका. यांना अरे-तुरे बोललं तर वाईट वाटतं मग गरीब मराठ्यांच्या लेकरांवर तुम्ही अन्याय करता तेव्हा काहीच कसं वाटत नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? याचं उत्तर द्या मग तुम्हाला किती आणि कसा वेळ द्यायचा हे आम्ही बघतो. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. सर्वपक्षीय ठराव कसला करता? कागदी घोडे नाचवू नका.”