धाराशिव – मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे 11 ऑक्टोबर पासून छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करत आहे.
धाराशिव येथे दि. 22 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे. तरी नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली दस्तावेज समिती पुढे सादर करावीत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे .
शिंदे समितीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका
मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने एक कोटी दस्तावेज तपासले. त्यातून त्यांना पाच हजार पुरावे मिळाले आहेत. जे सापडले नाहीत त्यात काय होतं? आम्हाला ते सांगणार आहात का? काहींवर शेती लिहिलं आहे तो माणूसही कुणबीच झाला असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
शिंदे समिती हैदराबादला जाते, मुंबईला येते पण यांना पुरावेच कसे सापडत नाहीत? त्यांनी अभ्यासकच बरोबर नेले नव्हते. एक पुरावा मिळाला तरीही तो आधार आणि पाच हजार पुरावे मिळाले तरीही आधारच. त्यामुळे कायदा लागू करण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत. कोट्यवधी लोक माझ्या सभेला आले होते. त्यांची वेदना आम्ही मांडली. आता सरकारला आरक्षण द्यावंच लागेल त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आत्ताचा वेळ हा आम्ही घेतलेला नाही हा सरकारने आमच्याकडे मागितला आहे. चाळीस वर्षांपासून हा लढा सुरु आहे. आमच्या प्रत्येक पिढीने आरक्षणासाठी लढावं हे आता खूप झालं. आमच्या वेदना समजून घ्या अशी विनंती आम्ही आता सरकारला करतो आहोत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे. मग आम्हाला का दिलं जात नाही? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.