मुरूम: मुरूम शहरात मटका सुरू करण्यासाठी एका इसमाकडून दरमहा १ लाख ४० हजार रुपयांचा हप्ता मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिव लाइव्हने या प्रकरणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यात वसूलदार रणखांब यांनी हप्ता मागितल्याचे दिसून येत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या इसमानं सांगितले की, त्याला स्वतःचा मटका धंदा सुरू करायचा होता. त्यावेळी वसूलदार रणखांब यांनी त्याच्याकडे दरमहा १ लाख ४० हजार रुपये हप्ता मागितला. तसेच, “साहेबांशी (सपोनि -संदीप दहिफळे) बोलणे झाले आहे. तुमची मिटिंग साहेबांशी करून देतो,” असेही रणखांब यांनी सांगितले.
या इसमानं या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ शूट करून पुरावा जमा केला आणि सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर या इसमाचा दोन वेळा इन कॅमेरा जबाबही झाला. सोलापूर एसीबीचे पोलीस मुरूममध्ये आले मात्र काहीही कारवाई न करता परतले.
१ लाख ४० हजार रुपयाचं झालं काय ?
तक्रारदार इसमाने सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करताना १५ नोव्हेंबर रोजी १ लाख ४० हजार रुपये रोख भरले आहेत. परंतु एसीबी पोलिसांनी सापळा न रचता वसूलदार रणखांब आणि सपोनि संदीप दहिफळे यांना मॅनेज झाले तसेच तक्रारदार इसमाचे १ लाख ४० हजार रुपये देखील हडप केले. यामुळे सोलापूर एसीबी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
धाराशिव लाइव्हच्या वृत्तानुसार, धाराशिवचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एसीबीचे पोलीस यांचे तोंड बंद करण्यात वसूलदार रणखांब आणि सपोनि -संदीप दहिफळे हे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मुरूम पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची तस्करी आणि इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.