धाराशिव : शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटद्वारे थेट सवाल केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत थेट भाष्य केले आहे.
कैलास पाटील यांनी ट्विटमध्ये नमूद केले की, मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांची दिशाभूल करून खोटी आश्वासने दिली गेली. आता नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीसोबतच्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीबाबत केलेल्या दाव्यावर पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी १५ टक्के आर्द्रतेचे सोयाबीन हमीभावाने विकत घेतल्याचा दावा केला आहे. परंतु, धाराशिवसह राज्यातील एकाही केंद्रावर अशी खरेदी झालेली नाही, असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्रांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आवाहन केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “जर नव्या सरकारची सुरुवातच खोट्या दाव्यांनी होत असेल, तर शेतकऱ्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? जमिनीवर या, वास्तव पाहा आणि मगच बोला. महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न आणू नका.”
पाटील यांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारकडून कोणते पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सन्माननीय देवेंद्रजी,
आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन!मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय… pic.twitter.com/3ursavZmOL
— Kailas Patil (@PatilKailasB) December 6, 2024