तुळजापूर – शासकीय कामात अडथळा, बनावट ओळखपत्राचा वापर आणि पुरावा नष्ट करण्याचा उघड प्रयत्न असूनही एका एसटी बस चालकाला न्याय मिळवण्यासाठी तब्बल आठ महिने पोलिसांच्या दारात खेटा माराव्या लागल्याची धक्कादायक ‘इनसाइड स्टोरी’ समोर आली आहे. एका बाजूला तुळजापूर व धाराशिव ग्रामीण पोलिसांची टोलवाटोलव आणि दुसऱ्या बाजूला आरोपी आगार प्रमुखाला वाचवण्यासाठी पोलिसांकडून तक्रारदारावरच आणला गेलेला दबाव, या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी चालकाने थेट ‘आत्मदहनाचा’ इशारा दिल्यानंतरच तुळजापूर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
घटनाक्रम एका दृष्टीक्षेपात
| तपशील | दिनांक व वेळ |
|---|---|
| गुन्हा घडल्याचा दिनांक |
२६ जानेवारी २०२६ (सकाळी ०६:३५ ते ०७:१५ वाजेदरम्यान) |
| गुन्हा दाखल झालेला दिनांक |
१७ सप्टेंबर २०२६ (रात्री २२:०४ वाजता) |
| बस मार्ग |
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर (MH 20 BL 2583) |
| प्रमुख आरोपी |
छगन बापुराव लोखंडे (बनावट कार्डधारक प्रवासी) व राम शिंदे (आगार प्रमुख, तुळजापूर) |
पोलिसांचा हद्दीचा वाद आणि ‘झिरो एफआयआर’ची टाळाटाळ
धाराशिव–तुळजापूर–सोलापूर बसमध्ये प्रवासी छगन लोखंडे याने ५३ टक्के शारीरिक दुर्बलतेचे बनावट कार्ड वापरल्याचे पकडल्यानंतर, बसमध्येच उपस्थित असलेले तुळजापूरचे आगार प्रमुख (DM) राम शिंदे यांनी अरेरावी करत “हे कार्ड फाडून टाका” असा आदेश दिला व कर्मचाऱ्यांना धमकावले.
या गंभीर प्रकारानंतर चालक उमेश दिलीप पवार तक्रार देण्यासाठी तुळजापूर पोलीस ठाण्यात गेले असता, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी ही घटना धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते असे सांगून गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. कायद्यानुसार ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) नोंदवणे बंधनकारक असताना तुळजापूर पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज धाराशिव ग्रामीणकडे पाठवून दिला. तब्बल एका महिन्यानंतर धाराशिव ग्रामीण पोलिसांनी “हा गुन्हा तुळजापूर पोलिसांच्याच हद्दीत घडला आहे” असे स्पष्ट करत हात वर केले.
पोलीस अधीक्षकांकडे धाव आणि मध्यरात्रीचा छळ
दोन ठाण्यांच्या टोलवाटोलवीला कंटाळून चालक उमेश पवार यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज सादर केला. त्यानंतर प्रकरणाला गती मिळण्याऐवजी तक्रारदाराचाच मानसिक छळ सुरू झाला. तुळजापूरचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी “फक्त प्रवासी छगन लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल होईल, आगार प्रमुख राम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही” अशी भूमिका घेत चालकाला अपमानास्पद वागणूक दिली.
तक्रारदाराचे निवेदनाद्वारे समोर आलेले मुख्य आरोप:
-
सह-आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न: तुळजापूर पोलीस ठाण्यात १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री फिर्याद देण्यास गेले असता, पोलिसांनी आगार प्रमुख राम शिंदे यांच्यावर BNS कलम २३८ (पुरावा नष्ट करणे) व सह-आरोपीचे कलम लावण्यास उघडपणे टाळाटाळ केली.
-
मध्यरात्री बेकायदेशीर डांबून ठेवले: फिर्यादी शासकीय कर्मचारी असतानाही चालकाला सलग ६ ते ७ तास पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आले आणि मध्यरात्री २:५० वाजता दबाव आणण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. चालकाने सदर नोटीसवर रात्रीची वेळ व कायदेशीर आक्षेप स्वतः नमूद करून ती स्वीकारली.
आत्मदहनाचा इशारा मिळताच यंत्रणा हलली
शासकीय पुरावा नष्ट करण्याचे आदेश देणाऱ्या आगार प्रमुखाला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध चालक उमेश पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “आगार प्रमुख राम शिंदे यांच्यावर सह-आरोपी म्हणून गुन्हा दाखल न झाल्यास मी आत्मदहन करीन,” असा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानंतर अखेर १७ सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलिसांनी गुन्हा (FIR No. 0461/2026) दाखल केला.
या प्रकरणात आता केवळ आरोपींवरच नव्हे, तर ८ महिने टाळाटाळ करून फिर्यादीचा मानसिक छळ करणाऱ्या तुळजापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवरही वरिष्ठ पातळीवरून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.





