मुरुम : शेताच्या बांधावर लोखंडी खांब रोवल्याच्या वादातून ५० हजार रुपयांची खंडणी मागत एका ६१ वर्षीय वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुरुम (ता. उमरगा) येथे उघडकीस आली आहे. मारहाण करताना आरोपींनी वृद्धाच्या गळ्यातील दीड तोळ्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि ‘तक्रार केलीस तर मुलाला खल्लास करेन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शामसुंदर मिणीयार (वय ६१ वर्षे, रा. बसवेश्वर चौक, मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे फिर्यादीचे नाव आहे. तर महेश विरेश गव्हाणे आणि भुवनेश्वर विरेश गव्हाणे (दोघे रा. मुरुम) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मिणीयार हे दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मुरुम येथील शेत गट क्र. १४८/५ येथे गेले होते. यावेळी नमुद आरोपींनी शेताच्या बांधाच्या अगदी मध्यावर लोखंडी खांब रोवले होते. खांब रोवल्याच्या कारणावरून आरोपींनी मिणीयार यांच्याकडे ५० हजार रुपये खंडणीची मागणी केली. मात्र, मिणीयार यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून दोन्ही आरोपींनी मिणीयार यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मिणीयार यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची साखळी बळजबरीने तोडून घेतली. तेथून निघून जाताना, “या घटनेची पोलिसांत तक्रार केलीस, तर तुझ्या मुलाला खल्लास करतो,” अशी गंभीर धमकी आरोपींनी दिली.
या घटनेनंतर संजय मिणीयार यांनी दि. ३ एप्रिल २०२६ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून मुरुम पोलिसांनी महेश गव्हाणे आणि भुवनेश्वर गव्हाणे या दोघांवर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११९(१), ३०८(२), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये खंडणी, चोरी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.






