धाराशिव: महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही धाराशिव जिल्ह्यात गुटख्याची राजरोस विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कर्नाटक राज्यातून येणारा गुटखा मुरूम पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्ह्यात प्रवेश करतो आणि संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यात पोहोचवला जातो.
विमल, गोवा, हिरा, हिना, आरएमडी, रजनीगंधा, बादशहा नावाचा गुटखा पानटपरी, हॉटेल्स आणि किराणा दुकानांमध्ये खुलेआम विकला जात आहे. गुटखा वाहतूक करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाकडून किमान २० हजार रुपये हप्ता म्हणून वसूल केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटक राज्यातून हा गुटखा राजू कलशेट्टी नावाचा गुटखा तस्कर पाठवतो. त्याला शेट्टी नावाने ओळखले जाते. हा शेट्टी मुरूमचा वसूलदार रणखांब जोपर्यंत ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत गुटखा पाठवत नाही. रणखांबच सर्व मॅनेज करत असल्याचे वृत्त आहे.गुटख्यामध्ये मुरूमच्या वसूलदाराची भागीदारी असल्याचे समोर आले आहे.
कर्नाटक राज्यातून हा गुटखा पिकअप, कार, आयशर टेम्पो, इन्व्हॉव्हा आदी वाहनातून पाठवला जातो. तो पुढे मुरूम, लोहारा, बेंबळी, ढोकी , कळंब पोलीस स्टेशन हद्दीतून नंतर बीड जिल्ह्यात जातो. प्रत्येक पोलीस स्टेशनला दर महिन्याला ठराविक हप्ता दिला जातो. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे सुरू आहे.
हा रणखांब मुरुमचा साहेबाना आणि पोलीस मुख्यालयात बसलेल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला धरून आहे. त्यामुळे रणखांब बरोबर अनेकजण मालामाल झाले आहेत.
मुरुमच्या एका पोलिसांने पकडलेला गुटखा जप्त करण्याऐवजी तो एका व्यापाऱ्याला विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.