मुरूम -मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे.
सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील तुगाव मोड येथील एका धाब्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून धाड टाकली
या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली असून, हा गैरकृत्याचा अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी आर. एस. गायकवाड करत आहेत.
तपासाची व्याप्ती वाढवली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या दोन्ही बांगलादेशी तरुणी सध्या धाराशिव पोलिसांच्या ताब्यात आहेत. या तरुणींनी भारतात नेमकी कशी आणि केव्हा घुसखोरी केली, तसेच या मोठ्या रॅकेटमागे आणखी कोणी सूत्रधार (आका) आहे का, याचा सखोल तपास संबंधित जिल्हा पोलिस आणि तपास अधिकारी करत आहेत. हे प्रकरण केवळ वेश्या व्यवसायापुरते मर्यादित नसून, मानवी वाहतूक आणि घुसखोरीशी संबंधित असण्याची शक्यता असल्याने पोलीस मुळापर्यंत तपास करत आहेत.
स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गंभीर आणि घाणेरडे प्रकार खुलेआम सुरू असताना, स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी नव्हती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुरूम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram





