तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर शहरात नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या २३ विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. कामांसाठीच्या निविदेतील नियम व अटींचे उल्लंघन करून जनतेची आणि शासनाची फसवणूक केली जात असल्याचे सांगत, ही बोगस कामे तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडी व घटक पक्षांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर नगर परिषदेमार्फत ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना सन २०२४-२०२५’ अंतर्गत शहरात एकूण २३ विकास कामे सुरू आहेत. या कामांसाठीच्या ई-निविदेतील अट क्रमांक १५ नुसार, कामांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी १५ किलोमीटरच्या आतील आरएमसी (RMC) प्लँटमधूनच काँक्रीट वापरणे बंधनकारक होते. मात्र, कंत्राटदाराकडून या अटीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
प्रत्यक्षात आरएमसी प्लँटचा वापर न करता ‘हात पलटी’ पद्धतीने, दगड मिक्स, दगडाचा चुरा आणि कमी सिमेंट वापरून ही कामे केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होत असून, ही एकप्रकारे शासनाची आणि तुळजापूरच्या जनतेची फसवणूक आहे, असेही महाविकास आघाडीने म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख मागण्या:
- सुरू असलेली सर्व २३ निकृष्ट दर्जाची विकास कामे तात्काळ थांबवण्यात यावीत.
- या कामांची देयके (बिल) तात्काळ थांबवण्यात यावीत.
- संबंधित गुत्तेदार संजय आण्णाप्पा पवार आणि आरएमसी पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे.
- सदर कामांचे ठेके रद्द (टर्मिनेट) करण्यात यावेत.
प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई न केल्यास, महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप, शरद जगदाळे, सुधीर कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
या निवेदनाच्या प्रती माहिती आणि योग्य कार्यवाहीसाठी तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.