नळदुर्ग – तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजप उमेदवार आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नळदुर्ग येथे सभा घेतली. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गडकरी यांनी विकासाच्या मुद्द्यांवर भर देत, जनतेला राणा पाटील यांच्या कामगिरीवर विश्वास ठेऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
गडकरी यांनी आपल्या भाषणात नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. “नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याचे काम काही शेतकऱ्यांच्या आडकाठीमुळे थांबले आहे. सरकारच्या कागदोपत्री या रस्त्याची जागा आधीपासूनच सरकारच्या मालकीची असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना याबाबत मावेजा मिळालेला नाही, अशी त्यांची तक्रार आहे,” असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने गडकरी यांनी ६६ कोटी रुपयांचा मावेजा मंजूर केला आहे, असे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षण करतच रस्त्याचे काम लवकरच पुन्हा सुरु केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याशिवाय गडकरी यांनी आपल्या कार्यकाळात सोलापूर – येडशी, तुळजापूर – लातूर आणि सोलापूर – अक्कलकोट या मार्गांवरील रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन त्यांना मार्गी लावल्याचे सांगितले. या रस्त्यांची कामे होण्यामुळे संबंधित भागातील प्रवास अधिक सुलभ झाला असून, विकासाला चालना मिळाली आहे.
गडकरी यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “आपण खाद्यपदार्थ जिथे चांगले मिळतात, तेथे हॉटेल निवडतो; आजारी पडलो किंवा शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर चांगला डॉक्टर शोधतो. तेव्हा जात-पात विचारत नाही. मग उमेदवार निवडताना जात का पाहावी?” असे विचारून गडकरी यांनी मतदारांना जातीय समीकरणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे आवाहन केले. “जो उमेदवार आपल्या मतदारसंघाचा विकास करतो, लोकांचे हित जपतो, त्याला निवडून दिले पाहिजे,” असे सांगत त्यांनी राणा पाटील यांच्या विकास कार्याची प्रशंसा केली.
गडकरी यांनी आ. राणा पाटील यांची ओळख एक प्रगतीशील नेता म्हणून करून दिली. “राणा पाटील हे सातत्याने मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत आहेत. मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विकास साधणारा, मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी काम करणारा उमेदवार निवडून दिला पाहिजे, त्यामुळेच राणा पाटील यांना विजयी करा,” असे आवाहन त्यांनी केले.
गडकरी यांच्या या भाषणाने सभेत उपस्थित मतदारांवर सकारात्मक प्रभाव पडला. राणा पाटील यांना मिळालेल्या विकासनिष्ठ भूमिकेसाठी मतदारांनी पाठिंबा दर्शवण्याचे आश्वासन दिले.
गडकरी यांचे संपूर्ण भाषण ऐका