धाराशिव- तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणाची शाई अद्याप वाळलीही नाही, तोच नळदुर्ग हद्दीत सापडलेल्या तब्बल १० कोटी ३८ लाख रुपयांच्या ‘हशीश ऑईल’ प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. ‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यानंतर पोलिसांनी मालेगावहून दोघांच्या मुसक्या आवळल्या खऱ्या, पण या कारवाईने उत्तरे मिळण्याऐवजी अनेक काळेकुट्ट प्रश्नच निर्माण केले आहेत. या गुन्ह्याची पाळेमुळे आणि व्याप्ती अत्यंत मोठी असल्याने, आता या प्रकरणाचा तपास नळदुर्ग पोलिसांकडून काढून थेट नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) कडे सोपवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणातील काही अत्यंत गंभीर आणि खळबळजनक मुद्दे खालीलप्रमाणे:
१. आरोपी फरार झाले, की पोलिसांनीच त्यांना ‘फरार’ केले?
या प्रकरणातील सर्वांत मोठा आणि संशयास्पद प्रश्न म्हणजे, १९ तारखेच्या रात्री नाकेबंदीदरम्यान नेमकं काय घडलं? सशस्त्र पोलिसांचा गराडा आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना मुख्य आरोपी पोलिसांच्या डोळ्यांदेखत १० कोटींची बॅग फेकून पसार कसे होऊ शकतात? आरोपींनी खरोखरच पोलिसांच्या हातावर तुरी दिली, की पोलिसांनीच त्यांना ‘सेफ पॅसेज’ देत पळून जाण्यास मदत केली? या ‘फरार’ नाट्याची उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.
२. अटक केलेले तर ‘लुंगेसुंगे’; मग यांचा ‘बोलविता धनी’ कोण?
पोलिसांनी आता नाशिकच्या मालेगावमधून वाशीम शहा आणि मोसीन खान या दोन आरोपींना अटक केल्याचे जाहीर केले आहे. पण १० कोटींची अमली संपत्ती हाताळण्याची या दोघांची खरंच ऐपत आहे का? हे तर केवळ ‘लुंगेसुंगे’ मोहरे (प्यादे) आहेत. या आंतरराज्यीय रॅकेटचा खरा ‘बोलविता धनी’ आणि मास्टरमाईंड कोण आहे? हे १० कोटींचे हशीश ऑईल तुळजापूर-नळदुर्ग परिसरात कोणाच्या इशाऱ्यावर आणि कोणत्या बड्या धेंडासाठी आणले जात होते?
३. तपास स्थानिक पोलिसांकडून काढून NCB कडे का द्यावा?
तुळजापूर परिसरात सातत्याने ड्रग्ज आणि अमली पदार्थांचे रॅकेट उघडकीस येत आहे. ही केवळ एका-दोन गुन्हेगारांची कामे नसून यामागे एक मोठे सिंडिकेट सक्रिय आहे. पोलिसांच्या नाकेबंदीतून मुख्य आरोपींचे निसटणे आणि केवळ प्याद्यांना अटक होणे, यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेर जोडलेले असल्याने, स्थानिक पोलीस याच्या मुळापर्यंत पोहोचू शकतील याची खात्री नाही. त्यामुळे या काळ्या बाजाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हा तपास तातडीने ‘NCB’ कडे सोपवणेच योग्य ठरेल.
‘हशीश ऑईल’ (Hash Oil) म्हणजे नेमकं काय?
“हशीश ऑईल हा गांजाच्या (Cannabis) झाडापासून रासायनिक प्रक्रियेने काढलेला एक अतिशय घट्ट, चिकट आणि तीव्र अर्क (Extract) असतो. यामध्ये ‘THC’ (नशा आणणारा मुख्य घटक) चे प्रमाण साध्या गांजापेक्षा किंवा चरसपेक्षा कैक पटींनी जास्त असते. दिसायला हा काळपट-हिरवट रंगाचा द्रव असून, तो अत्यंत वेगाने आणि भयानक नशा देतो. हा आरोग्यासाठी प्रचंड घातक आणि जीवघेणा ठरू शकणारा अमली पदार्थ असून, भारतात यावर NDPS कायद्यांतर्गत कडक बंदी आहे.”





