नळदुर्ग: नळदुर्ग घाटात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हिराचंद मुळे आणि गहिनीनाथ बिराजदार हे दोघे मोटारसायकलवरून उमरगा येथून धाराशिवकडे जात असताना नळदुर्ग घाटात मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर लहुजी शक्ती सेनेचे नेते शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जवळपास तीनशे लोकांनी सोलापूर-उमरगा रस्त्यावरील नळदुर्गजवळ रस्ता रोको करून चक्का जाम केला. गायकवाड यांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त करत पोलिसांवर हप्तेखोरीचे आरोप केले आणि रस्त्याच्या दुरावस्थेवरून प्रशासनाला धारेवर धरले. “हप्ते गोळा करीत उभे असताना त्यांना या रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत का? राजकीय नेते टक्केवारी मागत असल्याने रस्ता पूर्ण होत नाही. आजून किती लोकांचे बळी घेणार आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.