नळदुर्ग – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीतील क्रीडा स्पर्धा नुकतीच संपली आणि नळदुर्गच्या बालाघाट महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमक दाखवत ट्रॉफी उचलली. पण खरी धमाल त्यानंतरच सुरू झाली!
तर झालं असं, फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगरहून परतीच्या प्रवासात, रात्रीच्या वेळेस विद्यार्थाना भूक लागली. आता क्रीडा प्राध्यापकांनी विचार केला की “खेळाडूंना ऊर्जा देण्यासाठी काहीतरी भन्नाट खायला देऊया.” पण मग चुकून-माकून त्यांनी थेट बियर बारची वाट धरली!
मुलींनी मात्र बियर बारला “नो एंट्री” म्हणत विरोध केला. “आम्ही बॉक्सिंगसाठी आलोय, ग्लासिंगसाठी नाही,” असं ठणकावून सांगितलं. प्राध्यापकांनी मग एकटीच मोहीम फत्ते केली. तिथे जाऊन पोट भरून जेवण केलं आणि थोडीशी “ऊर्जा” म्हणजेच दारूही घेतली.
दरम्यान, खेळाडू मात्र रात्री उपाशीच परतीचा ३०० किलोमीटरचा प्रवास करत नळदुर्गला पोहोचले. त्यांच्या पोटाच्या वादळाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसऱ्या दिवशी हे कळताच पालकांची फौज थेट कॉलेज गाठली.
प्राचार्य राठोड यांनी मात्र “आपला प्राध्यापक साधारण भूक मिटवायला गेला होता, त्यात काय मोठं?” असं म्हणून प्राध्यापकांना कवचकुंडल देऊन वाचवले. यानंतर नळदुर्ग शहरात “खेळातला पंच चुकला की रेफ्री दोषी ठरतो का?” अशा हास्यस्पद चर्चांना उधाण आलंय.
आता या प्रकरणावर “नळदुर्ग बॉक्सिंग असोसिएशन”चा पुढचा राऊंड काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे!