धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई आणि लिपिक पदाची नोकरी लावतो म्हणून अनेक सुशिक्षित तरुणांना मोठ्या साहेबाच्या नळदुर्गमधील दलालाने लाखोंचा गंडा घातला आहे. अणदूरमधील जवळपास ३० पेक्षा अधिक तरुण या साखळी फसवणुकीचे बळी ठरले आहेत.
कसा रंगला हा “नोकरी मार्केट”?
- नळदुर्गचा दलाल मोठ्या साहेबाच्या आशीर्वादाने हा धंदा करत होता.
- अणदूरमधील एका मोबाईल विक्रेत्याने मध्यस्थ म्हणून फसवणुकीचा रोल घेतला.
- प्रत्येक उमेदवाराकडून ३ ते ४ लाख रुपये घेतले गेले.
- मोबाईल विक्रेता कमिशन खाऊन दलालाला पैसे देत होता, तर दलाल त्यातील काही हिस्सा साहेबांपर्यंत पोहोचवत होता.
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच पैशांची देवाणघेवाण झाली.
तक्रार, पुरावे आणि पोलिसांची उदासीनता
सहा महिने उलटले तरी नोकरीचा “कॉल लेटर” आला नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अणदूरच्या मोबाईल विक्रेत्याने स्वतःवरील बालंट टाळण्यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुराव्यासह तक्रार दाखल करूनही एक महिना उलटला, पण पोलिसांच्या तपासाचा वेग कासवाच्या गतीनेच!
पोलीस गुन्हा दाखल करणार की तपासाच्या नावाखाली अजून वेळ मारून नेणार?
हजारो स्वप्नं आणि लाखो रुपये गमावलेल्या तरुणांना न्याय मिळणार की नाही, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मोठ्या साहेबांची वरदृष्टी असलेल्या या दलालावर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत तरुणांनी “सोप्या नोकरीच्या” भूलथापांना बळी पडू नये, एवढेच सांगता येईल!