नळदुर्ग – नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींचा जामीन अर्ज मंजूर धाराशिव जिल्हा न्यायालयाने मंजूर केला असून, या दोन्ही आरोपींची आज जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
पैकी मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर याचा अटकपूर्व अर्ज जामीन छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मंजूर केला होता. तर उर्वरित चार जण जिल्हा कारागृहात बंदिस्त होते. अमीर अझहर जहागीरदार ( वय २२) याचा जामीन अर्ज धाराशिव जिल्हा न्यायालयाने काही दिवसापूर्वी मंजूर केला होता. त्यानंतर संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड या दोघांचा जामीन अर्ज मंजूर धाराशिव जिल्हा न्यायालयाने मंजूर केला आहे.
सदर आरोपींच्या वतीने ॲड. अमोल वरुडकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केलेला होता. या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होवून आरोपींचा नियमित जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मोहिते यांनी मंजूर केला. सदर प्रकरणात ॲड. अमोल वरुडकर यांना ॲड. भाग्यश्री. बी. कदम, ॲड. वैभव खांडेकर, ॲड. संजय व्हटकर, ॲड. रोहीत सोनवणे, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. जनक साळुंके ॲड. रजनीकांत ढेकणे ॲड. बालाजी पोतदार ॲड. सचिन जाधव यांनी सहकार्य केले. या दोन्ही आरोपींची आज जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.
गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा खोटा असल्याचा दावा संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड यांनी करून पोलिसांची पोलखोल केली होती. याप्रकरणी धाराशिव लाइव्हने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक अंधारे यांच्यासह सात जणांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. तसेच सर्वांची तीन वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात आली आहे. या सर्व पोलिसांचे आरोपीबरोबर हितसंबंध असल्याचे उघड झाले असल्याने त्यांना निलंबित करून सहआरोपी करावे , अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.