नळदुर्ग : नळदुर्ग बसस्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर उठलेले वादळ अधिकच गडद झाले आहे. गुन्हा दाखल व्हायला तीन दिवसांची संशयास्पद दिरंगाई झाल्यानंतर, एफआयआर नोंद होताच आरोपी मौलवी कासीम इनामदार हा मुंबईला फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे, नळदुर्ग पोलीस आरोपीला अटक करणार की त्याला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मोकळे रान देत आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
तीन दिवसांच्या दिरंगाईचे गूढ काय?
ही लाजिरवाणी घटना २ ऑगस्ट रोजी घडली. मात्र, पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत म्हणजे तब्बल तीन दिवसांचा वेळ घेतला. या तीन दिवसांच्या काळात आरोपी शहरात मोकाट फिरत होता. गुन्हा दाखल होताच तो मुंबईला पसार झाल्याने, ही दिरंगाई आरोपीला पळून जाण्याची संधी देण्यासाठीच होती का, असा थेट आरोप आता केला जात आहे.
या प्रकरणात आधीच पोलिसांनी पोक्सोसारखे कठोर कलम न लावता, केवळ सार्वजनिक उपद्रवाच्या सौम्य कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यातच या संवेदनशील प्रकरणाचा तपास कॉन्स्टेबलकडे सोपवून पोलिसांनी आपली अनास्था दाखवून दिली होती. आता आरोपी फरार झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
अटकेचे नाटक की जामिनाला अभयदान?
आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळूनही नळदुर्ग पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी मुंबईला पथक पाठवणार का, की हे सर्व केवळ अटकेचे नाटक असून आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पडद्याआड मदत केली जात आहे? या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देऊन, नळदुर्ग पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.