नळदुर्ग: होर्टी ते किलज रस्त्यावर इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा समोर बुधवारी संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.
शांताबाई विश्वनाथ तरमोडे (वय 59) आणि सुवर्णा विजयानंद टिकंबरे (रा. होर्टी) या दोघी पायी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकलने (क्र. एमएच 25 एटी 9301) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शांताबाई तरमोडे या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुवर्णा टिकंबरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटरसायकल चालकाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमाशंकर विश्वनाथ तरमोडे (वय 38, रा. होर्टी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटरसायकल चालकाविरुद्ध भादंवि कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) आणि 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरसायकल चालक हा हायगयी आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता. अपघातानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नळदुर्ग येथे रस्ते अपघातात तरुणाचा मृत्यू
नळदुर्ग: मानेवाडी शिवारात मंगळवारी दुपारी एका भीषण अपघातात 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सद्दाम याकुब अत्तार (वय 34, रा. नळदुर्ग) हे आपल्या मोटरसायकलने (क्र. एमएच 03 डीई 7973) मानेवाडी पाटीच्या पुलाजवळून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारने (क्र. एमएच 11 सीजी 1313) त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सद्दाम हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कार चालक धैर्यशील परशुराम कदम (रा. सातारा) यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुब महमद इसाक टिनवाले (वय 53, रा. नळदुर्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदम यांच्यावर भादंवि कलम 281, 106(1) आणि 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हे आपली कार हायगयी आणि निष्काळजीपणे रॉंग साईडने चालवत होते. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.