धाराशिव : जिल्हाधिकारी पदासाठी नवीन उमेदवार कोण असेल, हा प्रश्न सध्या धाराशिवकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. नेपोटीझमची हॅट्रिक आधीच गाजवलेल्या धाराशिव जिल्हाधिकारीपदावर आता चौकार होणार की या परंपरेला ब्रेक मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सध्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी आपल्या कार्यकाळात तुळजाभवानी मंदिराच्या अध्यक्षपदाचा दर्जा कडेकोट सांभाळत, तीन वेळा बोकड कापण्याचा ऐतिहासिक विक्रम केला. धाराशिवच्या इतिहासात हा “बोकड हॅट्रिक” विक्रम कुणालाही सहज साध्य होणार नाही, अशीही चर्चा आहे. पण सरकारच्या बदलत्या वाऱ्यांनी ओंबासे यांचे पंख छाटले असून, त्यांना आता “नॉन क्रिमीलेअर” प्रमाणपत्र चौकशीचा सामना करावा लागतोय.
नेपोटीझमचा दबदबा:
पदाचा हा मान केवळ कर्तृत्वावर मिळतो की “नातेसंबंधांच्या” गोड धाग्यांनी विणलेला असतो, हा प्रश्न चर्चेत आहे. धाराशिवच्या गेल्या तीन जिल्हाधिकाऱ्यांची “एकमेकांचे नातेगोते” असल्याचा इतिहास लक्षात घेता, लोकांमध्ये चहूबाजूंनी चिवचिवाट सुरू आहे – “नेपोटीझमचा चौकार तर होणार नाही ना?”
धाराशिवकरांचे कुतूहल:
धाराशिवचे नेते या परंपरेला बळ देतील की कर्तृत्वाला प्राधान्य देऊन जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करून देतील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. आता यासाठी नव्या जिल्हाधिकाऱ्याला “बोकड कापण्याचा अनुभव असेल का?” याची चर्चाही जोरात सुरू आहे.
धाराशिवकर आता फक्त एकच मागणी करत आहेत: “नेपोटीझमचा बकरा कापून जिल्हात विकासाची पहाट उजाडू द्या!”