धाराशिव – राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने, भेसळीमध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. तसेच दुध भेसळीमध्ये जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्ता पूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग शासन निर्णयान्वये शासनाने जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे.
जिल्ह्यातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने जिल्ह्यातील दुध भेसळ रोखण्याकरीता पोलिस प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, वैद्यमापन शास्त्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वय साधून संयुक्तीक कार्यवाही करुन दुध भेसळ रोखण्यासंदर्भात नियोजनबध्द व गोपनीयतेने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जिल्हास्तरीय दुध भेसळ समिती यांच्यामार्फत 8 डिसेंबर रोजी दुध भेसळ धडक मोहिमेंतर्गत लोहारा तालुक्यातील नेचर डिलाईट डेअरी ॲण्ड डेअरी प्रो.पो.धानुरी या केंद्रास दुध भेसळ धडक मोहिमेंतर्गत भेट दिली असता प्रथम दर्शनी गाय व म्हैस एकत्रित मिळून 6000 लिटर दूध संकलन झाले असल्याचे आढळून आले आहे. तपासणीसाठी गाय, म्हैस दुधाचे 2 नमुने घेण्यात आले आहेत. तसेच उमरगा तालुक्यातील कामधेनु दुध संकलन व कुलींग सेंटर जेवळी या केंद्रास दुध भेसळ धडक मोहिमेंतर्गत भेट दिली असता गाय व म्हैस एकत्रित मिळून 3087 लिटर दुध संकलन झाले असल्याचे आढळून आले आहे. तपासणीसाठी गाय, म्हैस दुधाचे 2 नमुने घेण्यात आले आहेत.एकंदरीत एकूण 3 नमुने सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दुध भेसळ प्रतिबंधक समितीमार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था आदी ठिकाणी दुध भेसळ तपासणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुध संकलन केंद्र, खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया यांनी उच्च गुणप्रतीचे भेसळ विरहीत वजनकाटे व दुध गुणप्रत तपासणी संयंत्रे नियमित प्रमाणीत करुन अद्यावत ठेवावीत. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ व पशुखाद्य आदीबाबत उत्पादन दिनांक व मुदतपूर्व वापराबाबत माहिती छापण्याविषयी सर्व विक्रेत्यांना जिल्हास्तरीय समितीने आवाहन केले आहे. तसेच दुध भेसळबाबत FSSAI टोल फ्री नं.1800 22 2365 हा उपलब्ध करुन दिलेला आहे. या टोल फ्री नंबरवरती दुध भेसळबाबत नागरीकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील विक्रेते, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, दुध भेसळ हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच दुधात खराब पाण्याची भेसळ केल्याने साथीच्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने याला आळा घालण्याकरीता यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. तसेच यासंदर्भात नागरिकांनी जागरूक राहावे. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत तसेच समितीच्या वतीने करण्यात येत आहे.