धाराशिव: रामवाडी परिसरातून पानबुडी मोटार चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या.
या निर्देशानुसार, ३ मार्च २०२५ रोजी सहायक पोलिस निरीक्षक कासार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. या विश्लेषणातून काही संशयितांची नावे समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, चोरी केलेला मुद्देमालही पोलिसांना मिळवून दिला.
पोलिसांनी दोन पानबुडी मोटारी, एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी, असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश पप्पू कसबे (रा. दत्तनगर, मुरुड, जि. लातूर) असे आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.