परंडा : गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी तसेच सात गोवंशीय वासरांना क्रूरतेने डांबून ठेवल्याप्रकरणी परंडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवार, दिनांक २३ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पल्ला गल्ली, कुर्डूवाडी रोड, परंडा येथे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५०० किलो गोमांस आणि सात जिवंत वासरे जप्त केली असून, एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फारुक इब्राहिम कुरेशी (वय ४३ वर्षे) आणि इरशाद चाँद कुरेशी (वय २८ वर्षे, दोघे रा. पल्ला गल्ली, परंडा) यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याचे मांस स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले होते. तसेच, सात गोवंशीय वासरांचे पालनपोषण न करता त्यांना निर्दयतेने डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या माहितीच्या आधारे परंडा पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन नमूद व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम ५(क), ९, ९(अ), (ब) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ११(१), ११(१)(च), ११(१)(ज), ११(१)(झ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.