परंडा : परंडा तालुक्यातील सरणवाडी शिवारात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली असून यात एका गटाने दुसऱ्या गटाच्या झोपडीला आग लावून नुकसान केले आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी सुखदेव सांगडे (वय ४२, रा. ब्रम्हगाव) आणि बाळासाहेब दिगंबर होरे (रा. पिंपळवाडी) यांच्यात शेतीवरून वाद होता. ३० जानेवारी रोजी बाळासाहेब होरे आणि त्यांची पत्नी अनिता होरे यांनी तानाजी सांगडे, त्यांची पत्नी आणि ट्रॅक्टर चालक अमोल काकडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, त्यांच्या झोपडीला आग लावली, ज्यात सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
या मारहाणीत तानाजी सांगडे जखमी झाले असून त्यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाळासाहेब होरे आणि अनिता होरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.