निवडणुकीचा हंगाम जवळ आला की, परंड्याचं राजकीय रणांगण तापायला सुरुवात होते. परंड्याचा इतिहास बघितला, तर तो ‘बाप्पा’च्या राजकीय किल्ल्याचा होता, अगदी सिमेंटच्या किल्ल्यासारखा मजबूत ! पण सिनेमा जसा ट्विस्टशिवाय पूर्ण होत नाही, तसाच परंड्याचा राजकीय सिनेमा देखील. १९९५ मध्ये राजकारणाच्या रंगमंचावर एंट्री झाली ती ज्ञानोबा तात्यांची. अगदी धक्कादायक नवख्या हिरोसारखी एंट्री करून त्यांनी बाप्पाला अशा रितीने हरवलं, जणू काही बाप्पा हा आपला कधीच हिरो नव्हता! शिवसेनेचा गड स्थापन झाला, आणि बाप्पाचं एककाळी दिमाखात चाललेलं साम्राज्य एका झटक्यात संपलं.
तात्या खुशीत होते, पण २००४ मध्ये ‘बाप्पा’च्या घराण्याचा वारसदार – भैय्या – थेट मैदानात उतरला. भैय्या हा कोण साधासुधा खेळाडू नव्हता, कारण त्याने वडिलांचा पराभवाचे दुखाचे डोंगर आपल्यावर पाडून घेतला होता. त्यानं झेप घेतली आणि आपल्या वडिलांच्या अपयशाचा बदला घेतला. बाप्पाचा मुलगा विजयी ठरला आणि तात्याचं स्वप्न तिथेच चिरडलं गेलं. भैय्याचं तेव्हापासूनचं विजयाचं नाणं असं काही पडलं की २००९ आणि २०१४ दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी तात्यांना थेट शेजारच्या बाकावर बसवलं. हॅट्ट्रिक विजेता म्हणून भैय्या परंड्याच्या राजकारणात ‘सुपरस्टार’ बनला.
असेच दिवस चालले होते, पण मातोश्रीला काहीतरी वेगळं सुचलं. २०१९ मध्ये मातोश्रीने परत तात्यांना मैदानात उतरवण्याऐवजी, करमाळ्याचे प्रा. डॉ. यांच्या हातात धुरा दिला. “हा कुठला नवीन डॉक्टर?” असा विचार भैय्या करत होता. पण हा डॉक्टर तर सर्जन, थेट राजकीय शस्त्रक्रिया करून भैय्याला मैदानाबाहेर पाडला. एकदम पहिल्या फटक्यात विजय! पण हा विजय म्हणजे एखाद्या रेसलिंग सामन्यात शिडी वापरून विजय मिळवल्यासारखा होता. कारण प्रा. डॉ. यांनी नंतर मातोश्रीला सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला. हीच ती ‘धोका-बाजी’ची खेळी! मातोश्रीच्या डोळ्यात प्रा. डॉ.ची नावाची नावड एकदम वाढली, आणि आता नव्या रणांगणात शिडीचं काय होणार याची चिंता सगळ्यांना वाटू लागली.
सध्या परिस्थिती अशी आहे की दोन्ही तात्या आणि भैय्या आता एकत्र येऊन प्रा. डॉ. ला हरवण्यासाठी कंबर कसून उभे आहेत. तात्या, जे पूर्वी एकमेकांचे शत्रू होते, आता एकाच गोटात आलेत. हा बदल म्हणजे, “शत्रूचा शत्रू मित्र असतो!” या म्हणीचं उत्तम उदाहरण. पण प्रश्न असा आहे की, मातोश्री कोणाला मैदानात उतरवणार? पहिल्या तात्याला की दुसऱ्या तात्याला? की मग भैय्या, ज्याने तात्यांना एकेकाळी हरवलं, त्याला मोकळं रान देणार? हे एक गुढ राहणार आहे, आणि मतदारसंघात सगळ्यांचं लक्ष याचं उत्तर शोधण्यात लागलंय.
आता प्रा. डॉ.चं काय? प्रा. डॉ. हे असे खेळाडू आहेत की त्यांच्याकडे इतका पेसा आहे की सगळं राजकारण पेसाळ करून सोडू शकतात. परंड्याचं राजकारण म्हणजे त्यांच्यासाठी ‘तालाब’ आहे, आणि त्या तालाबात तात्या, भैय्या हे सर्व खेकडे! प्रा. डॉ. यांच्या फंडामध्ये एवढी ताकद आहे की, त्यांनी जरी मतदारसंघातील सगळी मतं विकत घेतली, तरीही त्यांना काहीच फरक पडणार नाही. ह्या मैदानावर त्यांनी तळ्यातील खेकडे अशा रितीने खेळवले आहेत की त्यांना हरवणं म्हणजे समुद्रात तेल शोधण्यासारखं कठीण आहे.
राजकीय सीन हळूहळू अधिक रोमांचक होत चाललाय. एकीकडे तात्या-भैय्या जोडी लंगोट बांधून तयार आहे, तर दुसरीकडे प्रा. डॉ. यांची पेसाळ खेळी आणि शिंदे गटाची साथ. आता एकमेकांची लंगोट सुटणार की सगळे एकत्र होणार, हे पहाणं अत्यंत रंगतदार ठरणार आहे.
अंतिमतः, परंड्याच्या राजकीय रंगमंचावरचं हे नाटक म्हणजे एकदम फुल टू मसाला आहे – संघर्ष, खेळी, धोका आणि विजयाची आस. कोण जिंकणार? कोणाचं मैदान सुटणार? आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाची लंगोट गळणार? याची वाट सगळेच उत्सुकतेने बघतायत!
– बोरूबहाद्दर