धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हणजे एक मोठी सस्पेन्स थ्रिलर फिल्मच म्हणायची ! तीन दादांच्या या सिनेमात जास्त पात्रं नाहीत, पण धक्कातंत्र मात्र भरपूर आहे. गोवर्धनवाडीचे दादा, सारोळ्याचे दादा आणि तेरचे दादा, हे तिघं मिळून जिल्ह्याच्या राजकीय रंगमंचावर नेहमीच काहीतरी धुमाकूळ घालत असतात. यात गोवर्धनवाडीचे दादा खासदार आहेत, तर सारोळ्याचे आणि तेरचे दादा आमदार आहेत. हे सगळं ऐकून कुणाला वाटेल की हे एकमेकांचे मित्र किंवा सहकारी असतील, पण हे तर राजकारण आहे, इथे मैत्रीपेक्षा स्वार्थ आणि गुप्त शत्रुत्वाचं महत्त्व जास्त असतं!
तर पहिल्या अंकात आपण बघतो गोवर्धनवाडीचे आणि सारोळ्याचे दादा. दोघं ठाकरे सेनेच्या जर्सीत खेळतात. राजकारणात ज्यांना लाडक्या नावाने “दादा” म्हटलं जातं, त्यांची खास अशी मैत्रीही असते, गोवर्धनवाडीचे दादा लोकसभेत विरोधी बाकावर असले तरी नेहमी काही ना काही गर्जना करून मतदारांचे लक्ष वेधून घेत असतात. सारोळ्याचे दादा विधानसभेत अडीच वर्षे सत्ताधारी आणि अडीच वर्षे विरोधी बाकावर बसले आहेत. ते नवखे असल्याने गोवर्धनवाडीच्या दादाच्या संगतीत राहून राजकीय डावपेंच शिकत आहेत.
दुसरीकडे तेरचे दादा म्हणजे त्या सिनेमातील अॅक्शन हिरो! आधी राष्ट्रवादीत होते, तिथे थोडीफार धुळ झाडून बघितली, पण २०१९ च्या निवडणुकीत ते खासदार होण्यासाठी गोवर्धनवाडीचे दादा विरुद्ध निवडणूक लढवली, आणि आपटले! गोवर्धनवाडीच्या दादांनी त्यांना चांगलाच धक्का दिला, आणि तेव्हापासून तेरचे दादांचे खासदार होण्याचं स्वप्न मोडून पडलं.
पराभव स्वीकारणं म्हणजे तेरच्या दादांच्या शब्दकोशात नाहीच! ते लगेच राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये घुसले. या नवीन पक्षात त्यांनी बरेच फंडे आजमावले आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. आता मात्र दादांची खरी कमाल सुरू झाली. भाजपमध्ये असताना त्यांनी बायकोला म्हणजेच ताईला फुटीर राष्ट्रवादीमध्ये पाठवलं! असं एकही मोठं घराणं नाही जिथे दोन्ही पाय एकाच नांगरात घातले असतील. पण काय हो, ताईला काही गोवर्धनवाडीच्या दादांनी टिकू दिलं नाही. म्हणजे दोन्हीकडून त्यांनी तेरच्या दादांच्या डावावर पाणी फिरवलं.
आता ही सगळी गोष्ट बाजूला ठेवू. तेरचे दादांचे स्वप्न फक्त खासदार होणं नाही, त्यांना तर मंत्री व्हायचंय! त्यांच्या कार्यकर्त्यांनी बघा फलक लावले ‘भावी पालकमंत्री’ म्हणून. पण काय सांगावं, हे स्वप्न अजूनही फक्त फलकांवरच आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला कौल मिळालाच, पण शिवसेनेनं राजकीय गोटं फिरवलं, आणि तेरचे दादा विरोधी बाकावर धडकले. अडीच वर्षं तेरचे दादा अशा प्रकारे विरोधी बाकावर बसून त्यांचं ‘मंत्रीपद’ पाहत राहिले. आता अडीच वर्षं उलटल्यावर एकनाथ शिंदे यांची बंडखोरी झाली, आणि दादांनी पुन्हा सत्ताधारी बाकावर स्थान मिळवलं, पण मंत्रीपद काय मिळेना!
तेरचे दादांचे वडील म्हणजे खरं सिंह, घराण्यात गडगडणारा आवाज होता. गृहमंत्री म्हणून त्यांनी कितीतरी वर्षं आपला दबदबा राखला, पण तेरच्या सिंहाचा छावा अजूनही पिंजऱ्यातच आहे. म्हणजे काम तर करत आहेत, पण ‘मंत्री’ होण्याचं स्वप्न काही साकार होईना!
आता सगळेच जण २०२४ च्या निवडणुकीची वाट बघत आहेत. तेरचे दादा पुन्हा तुळजापूरमधून उभे राहणार आहेत. पण या वेळी गोवर्धनवाडीचे आणि सारोळ्याचे दादा तेरच्या दादांचा बळी घेण्यासाठी सज्ज आहेत! दोघांनी मिळून असा काही डाव आखला आहे की तेरचे दादा गुडघे टेकतीलच. आता सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे आहे की तेरचे दादा कसा तोड काढणार, आणि गोवर्धनवाडीच्या व सारोळ्याच्या दादांचे डाव फसणार की यशस्वी होणार?
धाराशिवच्या राजकारणात सगळं काही शक्य आहे. तेरचे दादा फसले तरी पुन्हा उठतील, आणि गोवर्धनवाडीचे दादा काही कमी नाहीत. सगळ्यांच्या डावपेचांमध्ये कोणता दादा जिंकणार आणि कोणाचं स्वप्नं मोडणार, याकडे सगळ्याचं लक्ष आहे. राजकारणाच्या या खेळात, शेवटी सत्तेची खुर्ची कोणाच्या हातात येते, हे पाहणं तितकंच रोचक असणार आहे!
– बोरूबहाद्दर