तुळजापूर विधानसभा निवडणूक जवळ आली की, साहेबांचा उत्साह पुन्हा एकदा उफाळून येतो. ८५ व्या वर्षीही ‘साहेब’ काठीचा आधार घेत नसून, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार करताहेत. मागच्या वेळी मतदारांनी निवृत्तीची ऑर्डर दिली, पण साहेबांना निवृत्तीपेक्षा विधानसभेची खुर्ची अधिक प्रिय आहे. “सोडा रे बाबा,” असं म्हटलं तरी तेच म्हणतात, “हा माझा अखेरचा घोडा आहे!” असा सुसाट घोडेस्वार कधी रिटायर होईल, ते खंडोबाच जाणे!
आता साहेब काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत, पण पोरगा मात्र भाजपमध्ये सेट झाला आहे. गावात लोक मुलाला ‘मालक’ म्हणून हाक मारतात, पण मालकही सध्या आजारीच आहेत. साहेब मात्र वयाची शंभरी गाठायची तयारी करत, ‘तुळजापूरचं विधानसभेचं तिकीट माझं’ असा हक्क सांगताहेत. आता त्यांची हौस म्हणा की हट्ट, विधानसभेत जायचं म्हणजे जायचं!
आता मजा अशी की, साहेब खंडोबाचे निस्सीम भक्त. चार वेळा आमदारकी, कॅबिनेट मंत्रिपद, सभापतिपद सर्व काही मिळालं, पण खंडोबाचं साधं एक सभागृह बांधायला मात्र विसरले. म्हणे, खंडोबा नाराज झाला, आणि साहेबांचा मागच्या निवडणुकीत घोडा लंगडला! आता तुळजाभवानी देवीचाही राग आहे, कारखान्यात जाळं बसलंय, लोक मोर्चे घेऊन घरापर्यंत येताहेत, पण साहेब अजूनही स्वप्नांच्या घोड्यावर स्वार आहेत.
तुळजापूरच्या निवडणुकीत नेहमी धोतरवालाच जिंकायचा, पण २०१९ मध्ये खंडोबाच्या कोपामुळे पँटवाले राणा दादा जिंकून गेले. साहेबांनी आता धोतर खेचून पुन्हा एकदा रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. गावभर चक्कर मारताहेत आणि पँटवाल्याला पाडायचं, असं ठरवलंय. साहेबांची जीद्द तशी अजून टिकून आहे – वयाचं काय घेऊन बसलात, त्यांचं हृदय तर अजूनही तरुणच !
साहेबांनी काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करण्याचा विचार केला, पण लोकांनी हजेरी लावली नाही. काय करणार, ‘घर फिरलं की वसेही फिरतात,’ अशी स्थिती आहे. पण साहेब अजूनही ठाम आहेत – तुळजापूर तालुका माझ्या शिवाय आणि काँग्रेस माझ्या चेहऱ्याशिवाय काही होणार नाही!
पक्ष साहेबांना लास्टचा चान्स देणार का? की साहेबांनी पुन्हा “ही शेवटची निवडणूक आहे” म्हणत असतानाच आणखी एक निवडणूक लढवायचं ठरवलंय, हे पाहणं खरंच विनोदी आणि मनोरंजक ठरणार आहे.
– बोरूबहाद्दर