परंडा: लग्नाचे आमिष दाखवून एका ४३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार परंडा तालुक्यातील रोसा येथे उघडकीस आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पैसे आणि दागिने घेऊन नवरी पळून गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी बनावट नवरीसह तिघांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण दशरथ कोरे (वय ४३, रा. रोसा, ता. परंडा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी अनिल श्रीमंत माने, तानाजी नारायण वर (दोघे रा. शेलगाव क., ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि सुरेखा जाधव (रा. लातूर) यांनी संगनमत करून हा कट रचला.
आरोपींनी लक्ष्मण कोरे यांना लग्नाचे प्रलोभन दाखवले आणि सुरेखा जाधव हिच्याशी त्यांचे लग्न लावून दिले. लग्न लावून दिल्याच्या बदल्यात आरोपींनी कोरे यांच्याकडे २ लाख ५० हजार रुपये रोख आणि दीड तोळे सोन्याची मागणी केली. फिर्यादीने विश्वास ठेवून हे पैसे आणि दागिने दिले. मात्र, पैसे आणि दागिने हाती लागताच आरोपी सुरेखा जाधव ही सर्व मुद्देमाल घेऊन पळून गेली. हा प्रकार २१ जुलै २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला.
गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लक्ष्मण कोरे यांनी १३ डिसेंबर २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक) आणि ३(५) (संगनमत) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.







