परंडा – कत्तलीच्या उद्देशाने केली जाणारी गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यात परंडा पोलिसांना यश आले आहे. भूम-वारदवाडी रस्त्यावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी ६ जनावरांची सुटका केली असून, वाहनासह एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ११ जून २०२५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भूम-वारदवाडी रस्त्यावरील निजाम शिवारात ही कारवाई करण्यात आली. संतोष जाधव यांच्या शेताजवळ एमएच १२ एन एक्स ५२२५ या क्रमांकाच्या वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात दोन जर्सी गायी आणि चार जर्सी खोंड यांना चारा-पाण्याची सोय न करता अत्यंत निर्दयतेने कोंबून भरल्याचे आढळून आले. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तात्काळ वाहनातील सर्व ६ जनावरांची सुटका केली आणि वाहन जप्त केले. याप्रकरणी चालक जिशान गफुर शेख (वय २२, रा. सिकलकर गल्ली, परंडा) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम आणि जनावरांच्या वाहतूक नियमांतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत जप्त केलेल्या जनावरांची आणि वाहनाची एकूण किंमत ६ लाख ४० हजार रुपये आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.