परंडा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि सावता माळी फर्निचर दुकानासमोर एका मद्यधुंद रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी घडली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासगाव (ता. परंडा) येथील रहिवासी लक्ष्मण सुदाम भांगे (वय ३९) हे रविवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास आपल्या कामासाठी शहरात आले होते. यावेळी आरोपी मुजबील खॉजा शेख (रा. बावची, ता. परंडा) याने आपली रिक्षा भांगे यांच्या गाडीसमोर आडवी लावली. “माझ्या रिक्षासमोर गाडी का थांबवली?” असा जाब विचारत आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली.
आरोपी मुजबील हा दारूच्या नशेत धुंद होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने फिर्यादी लक्ष्मण भांगे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याने काठीने मारहाण करून भांगे यांना जखमी केले. तसेच त्यांच्या वाहनाची समोरील काच फोडून नुकसान केले व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी जखमी लक्ष्मण भांगे यांनी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या खबरीवरून पोलिसांनी आरोपी मुजबील खॉजा शेख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ३५५, ११८(१), ३५२, ३५१(२), ३२४(४), ११०, ११२, ११७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ८५(१) व ८५(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.






