परंडा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी राजकीय नाटक, गोंधळ, आणि हास्याच्या लाटांचे मिश्रण होत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात उमेदवारीसाठी जो गोंधळ सुरू आहे, तो इतका मजेदार आणि विचित्र आहे की लोकं राजकीय व्यासपीठावर प्रेक्षकांसारखे बसून फक्त टाळ्या वाजवत आहेत.
गोंधळाची सुरुवात बुधवारी रात्री झाली. धाराशिव आणि परंडा विधानसभा मतदारसंघांसाठी शिवसेना (उद्धव गट) ने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली होती. धाराशिवमधून विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी मिळाली होती, तर परंड्यात दिवंगत आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर झालं होतं. आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. पण गोंधळाचा कळस तेव्हा झाला, जेव्हा शिवसेनेच्या अधिकृत लेटरपॅडवर परंड्याच्या उमेदवाराचं नाव चुकून ‘रणजित पाटील’ न छापून ‘राहुल ज्ञानेश्वर पाटील’ छापून आलं.
झालं! आता सगळं गाव काय घडतंय ते समजून घेण्याच्या तयारीत होतं. काही जण म्हणाले, “अहो, काय चाललंय? नाव बदलल्याने उमेदवारी बदलणार का?” तर काही लोकं असं म्हणू लागले की, “काय माहित, कदाचित राहुलचं नाव आधी ठरलं असावं आणि ते आता उघड झालं असावं!” परंतु एक चहावाला जो राजकारणावर तासंतास भाष्य करत असतो, त्याने हसत हसत विचारलं, “अहो, परंड्याच्या तूरडाळीइतका गोंधळ या उमेदवारीच्या घोषणेमुळे झाला आहे. आता माणूस कोणतेच हे कसं कळणार?”
स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हा गोंधळ आणखी गंभीर झाला. शिवसेनेचे कार्यकर्ते रणजित पाटील यांच्या नावाच्या चुका झाल्याचं सांगत होते. “नावाचा गोंधळ झाला, बाकी काही नाही. रणजितच उमेदवार असणार,” असं एक कार्यकर्ता विश्वासाने सांगत होता, जणू काही तो खुद्द मुखपत्र ‘सामना’चं संपादन करत होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, राहुल मोटे यांची उमेदवारी पक्की झाल्याच्या आशेने उड्या मारत होते. “राहुल मोटे तर विजयी ठरणारच! आता महाविकास आघाडीच्या बॅनरखाली त्यांची उमेदवारी पक्की!” असं ते स्वतःच्या डोक्यात पराभूत न झालेल्या मोर्चासारखं घोषणा करत होते.
अनेक तर्कवितर्क चालू असताना, एक शेतकरी म्हणाला, “हे सगळं राजकीय हंगामाप्रमाणे आहे. जसं हंगामात हवामान बदलतं, तसंच उमेदवार बदलत आहेत. आम्ही बघू कोण जिंकतोय!” परंड्याच्या मार्केटमध्ये आज एका ठिकाणी कोणी भाजी विकत घेत नव्हतं, कारण सगळे लोकं राजकारणाची जळमटं काढत बसले होते.
गोंधळाचा अगदी मध्यबिंदू म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना.’ ज्याने आणखी गोंधळ घातला. यादीत रणजित पाटीलचं नाव नाही? आणि राहुल ज्ञानेश्वर पाटीलचं नाव नाही ? आता हा नवीनच घोळ! लोकं बोलू लागली, “काय हो, हा राहुल पाटील आहे कोण? तो रणजितच्या जागी आलाय का?” परंड्याचं हे नावाचं नाट्य जणू रोज नवीन भाग घेऊन येत होतं. कोण उमेदवार आहे हे कळलंच नाही, पण त्यात लोकांना मनोरंजन जरूर मिळत होतं.
महाविकास आघाडीमधल्या तिघांच्या (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) दरम्यान परंड्याचं राजकीय युद्ध असं सुरू होतं की, शत्रूही इतकं गोंधळलेले नव्हते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहुल मोटे यांचं नाव आघाडीत पक्कं असलंच पाहिजे, असा विश्वास ठेवत होते. पण त्या गोंधळात शिवसेनेचा उमेदवार गडबडीत कुठे तरी हरवला होता.
चहा पिणाऱ्या एका पत्रकारानं मिश्कील हसत असं म्हटलं, “काय म्हणायचं या सगळ्याला? हे तर जणू काही उमेदवारीचं म्युझिकल चेअर्स चालू आहे!” त्याच्या शेजारी उभा असलेल्या भाजीवाल्यानेही तोंडातलं पान काढत अशीच प्रतिक्रिया दिली, “म्युझिकल चेअर्सचं काही नाही हो, हे तर जणू ‘खोटं बोल पण रंगवून बोल’ असं राजकारण सुरू आहे.”आता गावातलं प्रत्येक माणूस फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतं, “परंड्याचा उमेदवार कोण?”
परंड्याच्या राजकारणाची गंमत अशी झाली आहे की लोकांना आता उमेदवार महत्त्वाचा नाही, त्यांना रोजच्या गोंधळाचं नवीन दृश्य पहायचं आहे. हे राजकीय नाटक जणू परंड्याच्या बाजारात ‘संपल्याशिवाय संपणार’ असं हंगामी नाटक आहे. आणि गावकऱ्यांसाठी हीच उत्सुकता असली की, हे नाटक किती दिवस चालणार, आणि अखेर कोण जिंकणार.
सार्वजनिक मंचावर आता सर्वच जण हसताहेत. लोकं हसतायत, कार्यकर्ते हसतायत, आणि परंड्याचं राजकारण एका विनोदी नाट्याप्रमाणे अखेरच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे.
– बोरूबहाद्दर