परंडा – कपिलापुरी येथे विधानसभेत विरोधात मतदान केल्याच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १२ जणांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण सतीष शिंदे (वय २२, रा. कपिलापुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राजकुमार जैन, जयकुमार जैन, भरतेश आवानी, जयघोश जैन, किशोर आवानी, वैभव आवानी, नाबिराज आवानी, बाहुबली मसलकर, जितेंद्र वसगडेकर, अनिल वसगडेकर, जणजित राजकुमार जैन आणि जगदीश जैन (सर्व रा. कपिलापुरी) यांनी त्यांना व त्यांच्या आई व चुलती यांना विधानसभेत विरोधात मतदान केल्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.
या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या यशवंत बोडरे यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी शिंदे यांच्या घरातील सामानाची नुकसान केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 118(1), 115(1),189(2), 189(4), 190, 191(2), 191(3), 333, 324(4), 76,352, 351(3) सह 3(1)(ओ), 3(1)(आर), 3(1),(एस), 3(1) (W) (I) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घारगावात वृद्धाला मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी
परंडा: घारगाव येथे एका वृद्धाला शिवीगाळ का करता असे विचारण्यावरून तीन जणांनी लाथाबुक्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता घारगाव येथील ६५ वर्षीय दस्तगीर सरदार पठाण यांना माऊली सुरेश करडे, किशोर नाना लटके आणि भगवान शशीकांत लटके (सर्व रा. घारगाव) यांनी शिवीगाळ केली. पठाण यांनी त्यांना शिवीगाळ का करता असे विचारताच, तिघांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी काठीनेही त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पठाण जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पठाण यांच्या पत्नी आणि सुनेलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर दस्तगीर पठाण यांनी २६ नोव्हेंबर रोजी परंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या वैद्यकीय जबाबावरून पोलिसांनी माऊली करडे, किशोर लटके आणि भगवान लटके या तिघांविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2) 352, 351(2),324(4), 3(5)अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.