धाराशिव : परंडा तालुक्यातील शिरसाव शिवारात 34 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद नागनाथ बोराडे (वय 34, रा. दरेवाडी, ता. भूम) यांनी 11 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 ते 11.45 वाजण्याच्या सुमारास शिरसाव शिवारातील बिरमल रामकृष्ण चौबे यांच्या शेतातील गट क्रमांक 1095 च्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी हर्षद यांचे वडील नागनाथ सोपान बोराडे (वय 64, रा. सावरगाव, ता. भूम, सध्या रा. दरेवाडी) यांनी 12 ऑक्टोबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, हर्षद बोराडे यांच्या पत्नी पूजा हर्षद बोराडे (रा. उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) आणि अजिंक्य आहिरे (रा. उरळी कांचन) यांच्यातील कथित अनैतिक संबंध तसेच धमक्यांना कंटाळून हर्षद यांनी आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 352, 351(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.




