येरमाळा : येरमाळा परिसरात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एकाची दुचाकी, दुसऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी, तर तिसऱ्याच्या गाडीचे नुकसान करून लॅपटॉप पळवला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ८ एप्रिल) येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आमराई मंदिर परिसरातून दुचाकी चोरीला
पहिल्या घटनेत राजमोहम्मद सलिम शेख (वय ५२, रा. खाजानगर, जि. धाराशिव) यांची अंदाजे ८० हजार रुपये किमतीची ‘होंडा शाईन’ दुचाकी (क्र. एमएच २५ एएक्स ५४९६) येरमाळा येथील आमराई मंदिर परिसरातून चोरीला गेली. ३ एप्रिल रोजी रात्री ११ ते ४ एप्रिलच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ही गाडी चोरून नेली.
‘चुनाच्या रानात’ सोन्याची साखळी लांबवली
दुसरी घटना येरमाळा येथील ‘चुनाच्या रानात’ घडली. अंबरनाथ (जि. ठाणे) येथून आलेले तेजस चंद्रकांत मोटे (वय ३०, रा. ग्रीन सिटीजवळ, अंबरनाथ पूर्व) यांच्या गळ्यातील सुमारे ८५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत हातोहात लांबवली.
कारची तोडफोड करत ८० हजारांचा लॅपटॉप पळवला
तिसरी घटनाही ‘चुनाच्या रानात’ ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. कामानिमित्त आलेले इंदापूर (जि. पुणे) येथील रहिवासी मनोहर बाळासाहेब जगताप (वय ३४, रा. साकुर्डे) यांच्या कारचे (क्र. एमएच १२ युएन ८९११) अज्ञात चोरट्यांनी नुकसान केले. तसेच, आत ठेवलेला कंपनीचा ८० हजार रुपये किमतीचा ‘एचपी’ (HP EliteBook) लॅपटॉप चोरून नेला.
या तीनही घटनांनंतर बुधवारी (ता. ८ एप्रिल) राजमोहम्मद शेख, तेजस मोटे आणि मनोहर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येरमाळा परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.





